वृत्तसंस्था/नवी दिल्ली
यावर्षी सर्वाधिक कमाईत भारतीय अब्जाधिशांचा विचार करता अदानी ग्रुपचे चेअरमन गौतम अदानी आता तिसऱया नंबरवर पोहचले आहेत. त्यांनी आशियातील सर्वात श्रीमंत मुकेश अंबानी यांनाच नाही तर जगातील श्रीमंतांना मागे टाकले आहे. यावर्षी अदानींच्या संपत्तीत 52 अब्ज डॉलर्सची भर पडली आहे. अदानी हे मार्क झुकरबर्ग, जेफ बेजोस, स्टीव्ह वॉल्मर, लॅरी एलिशन, वॉरेन बफेट यांच्यापुढे आहेत. यांच्यानंतर एलॉन मस्क, बर्नार्ड अर्नाल्ट हे आहेत. मस्क यांच्या संपत्तीत यावर्षी 123 अब्ज डॉलर्सची वाढ झाली आहे. बर्नार्ड यांच्या संपत्तीत सुमारे 56 अब्ज डॉलर्सची वाढ झाली आहे. लॅरी पेज यांच्या संपत्तीत 47 अब्ज डॉलर्सची भर पडली आहे.
यावर्षी एकंदर पाहता भारतीय अब्जाधिशांचा विचार केल्यास मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत 20.5 अब्ज डॉलर्स, गौतम अदानी यांच्या संपत्तीत 52 अब्ज डॉलर्स, शिव नाडर यांच्या संपत्तीत 5.29 अब्ज डॉलर्स, अझीम प्रेमजी यांच्या संपत्तीत 11.8 अब्ज डॉलर्सची भर पडली आहे.
ब्लूमबर्ग बिलेनियर निर्देशांकानुसार ताज्या यादीत एलॉन मस्क 294 अब्ज डॉलर्ससह पहिल्या स्थानावर आहेत. जेफ बेजोस 200 अब्ज डॉलर्ससह दुसऱया आणि बर्नार्ड 170 अब्ज डॉलर्ससह तिसऱया स्थानावर राहिले आहेत. या यादीत गौतम अदानी हे 85 अब्ज डॉलर्ससह 13 व्या स्थानावर आहेत.