प्रतिनिधी/ बेळगाव
कोरोनाच्या ग्रहणात बाजारपेठेवर अनेक दिवस मंदीचे सावट आले होते. रविवारचा बाजार देखील कोरडाच होता. मात्र आता कोरोनाच्या संकटानंतर ठप्प झालेली बाजारपेठ पुन्हा उभारी घेऊ लागली आहे. मात्र रविवारी सूर्यग्रहणाचे वेध बाजारपेठेसाठी समस्येच्या ग्रहणात अडकविणारे ठरले. बाजारपेठेला जणू सूर्यग्रहणाचे खरेखुरे ग्रहणच लागले होते. सर्व व्यवहार सुरू असले तरी ग्राहकांची वर्दळ नसल्याने आर्थिकदृष्टय़ा बाजारपेठ पूर्णतः ठप्प असल्याचे दिसून आले. पावसाने सकाळपासून विश्रांती घेतली होती. यामुळे व्यवसाय होईल, अशा आशेत असणाऱया व्यावसायिकांना ग्रहणाचा फटका बसला. परिणामी दुपारपर्यंत बाजारपेठेत सर्वत्र शुकशुकाटच होता. यामुळे खऱया अर्थाने पुन्हा एकदा लॉकडाऊनचा अनुभव आला.
कोरोनातील लॉकडाऊन काळानंतर व्यापारी व्यावसायिक आता कुठेतरी सावरु लागले आहेत. मात्र रविवारी लागलेल्या ग्रहणामुळे बाजारपेठेतील लाखोची उलाढाल करून देणारा बाजार कोरडाच गेला. एका बाजूला कोरोनाच्या संकटछायेत देखील नागरिकांकडून खरेदी पेली जात असल्याचे दिसून येत असताना सूर्यग्रहणाचा परिणाम रविवारी सर्वांनीच अनुभवला. भाजीबाजारापासून मोठमोठय़ा दालनांपर्यंतचे सर्व व्यवहार ग्राहकांच्या प्रतीक्षेत असल्याचे दिसून आले. ग्रहणकाळ पुण्यकाळ असल्याचे पंचांगकर्त्यांचे म्हणणे असले तरी कोरोनाच्या संकटानंतर लागलेले ग्रहण काटेकोर पाळण्यात आल्याचे दिसून आले.
सुटी, अमावस्या आणि ग्रहणाचा योग
रविवारी सुटीच्या दिवशी प्रामुख्याने खरेदीकडे कल असतो. यामुळे रविवारचे बेळगावचे मार्केट फुल्ल असते. मात्र कोविड-19 च्या संकटानंतर अमावस्या, ग्रहण, सुटीचा दिवस आणि योग डे हे सर्व रविवारीच असल्याने नागरिकांनी घरी राहणे पसंत केले. सुटीच्या दिवशी कामामध्ये येणारी पठारवस्था ग्रहणामुळे अधिकच दाट झाली. यामुळे सकाळपासूनच बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी करणाऱया नागरिकांनी बाजारपेठेकडे पाठ फिरविली. यामुळे अनलॉकमधील हा रविवार लॉकडाऊन प्रमाणेच अनुभवत असल्याच्या प्रतिक्रिया व्यावसायिकांमधून व्यक्त करण्यात आल्या.