शहरी भागात शॉपिंग कॉम्प्लेक्स वगळून अन्य दुकानांना परवानगी : शहरी, ग्रामीण सलून मात्र बंदच राहणार
परराज्यातील मजूर, विद्यार्थी, पर्यटकांना गावी जाण्यास परवानगी
मद्यविक्री दुकानांना परवानगी, मात्र बार, परमिटरुम बंदच राहणार
गोव्यात अडकलेल्यांना जिल्हय़ात आणण्यासाठी गोवा शासनाकडे प्रस्ताव
दुकाने सुरू केली, तरी सोशल डिस्टन्सिंग, अन्य नियम पाळणे मात्र बंधनकारक
प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:
सिंधुदुर्ग जिल्हा सध्या ‘ऑरेंज झोन’मध्ये आहे. प्रत्येक झोनविषयी राज्य शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार सिंधुदुर्ग जिल्हय़ाच्या ग्रामीण भागातील सर्व दुकाने सुरू करण्यासाठी परवानगी असणार आहे. तर शहरी भागात शॉपिंग कॉम्प्लेक्स (फक्त जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरू राहणार) वगळून एकटी असणारी सर्व दुकाने सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मद्यविक्रीची दुकानेही सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. परराज्यातील मजूर, पर्यटक आणि विद्यार्थी यांना त्यांच्या मूळ गावी जाण्यासाठी परवानगी देण्यास सुरुवात केली आहे. गोव्यात अडकलेल्यांना आणण्यासाठीचा प्रस्ताव गोवा राज्य शासनाकडे पाठविण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी सोमवारी येथे दिली.
राज्यात तिसऱया लॉकडाऊनचा कालावधी 17 मेपर्यंत वाढविण्यात आल्यानंतर राज्य शासनामार्फत मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा हा ऑरेंज झोनमध्ये येत असल्याने राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार जिल्हय़ात काय सुरू करावे आणि काय नाही, याबाबत जिल्हाधिकाऱयांकडून स्पष्टिकरण देण्यात आले आहे. त्यानुसार जिल्हय़ाच्या ग्रामीण भागातील सर्व दुकाने सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. तसेच शहरी भागात शॉपिंग कॉम्प्लेक्स व मार्केट कॉम्प्लेक्समधील जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता सर्व दुकाने बंद राहणार आहेत. या व्यतिरिक्त असणारी सर्व एकल दुकाने सुरू करण्यास हरकत नाही, असेही स्पष्ट केले आहे. जिल्हय़ात सलून सुरू करण्याबाबत संभ्रमाचे वातावरण होते. याबाबत जिल्हाधिकाऱयांना विचारणा केली असता जिल्हय़ात सलून सुरू करण्यास अद्याप परवानगी दिली गेलेली नाही, असे जिल्हाधिकाऱयांनी स्पष्ट केले.
मद्य विक्री दुकानांना परवानगी
सिंधुदुर्ग जिल्हा ऑरेंज झोनमध्ये आहे. त्याप्रमाणे जिल्हय़ात मद्यविक्रीची दुकाने सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. यामध्ये देशी दारू व दुकाने, वाईन शॉप, बियर शॉपी अशाप्रकारच्या मद्यविक्री दुकानांना परवानगी देण्यात आली आहे. मात्र बिअरबार परमिट रुम सुरू करण्यास परवानगी देण्यात आलेली नाही, असेही जिल्हाधिकाऱयांकडून स्पष्ट करण्यात आले. तसेच जिल्हय़ातील शासनाच्या आदेशानुसार जी-जी दुकाने सुरू करण्यास परवानगी दिली आहे, त्या सर्व दुकानदारांनी शारीरिक अंतर ग्राहकांकडून योग्य पद्धतीने पाळले जाईल, याची दक्षता घ्यावी. तसेच कोरोनासंदर्भात घ्यायच्या सर्व दक्षता घेऊन व्यवहार करायचे असल्याचे जिल्हाधिकाऱयांनी स्पष्ट केले.
मजूर, विद्यार्थी, पर्यटकांना मूळ गावी पाठविण्यास परवानगी
जिल्हय़ात अडकलेल्या परराज्यातील मजूर, विद्यार्थी, कामगार, पर्यटक यांना त्यांच्या मूळ गावी जाण्यासाठी परवानगी देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. यामध्ये आतापर्यंत राज्यस्थानमधील 129 मजूर व कामगारांना त्यांच्या मूळ गावी जाण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. हे सर्वजण त्यांच्या स्वतःच्या वाहनाने प्रवास करणार आहेत. आंध्र प्रदेश येथील भारतीय भूगर्भ सर्वेक्षण संस्थेचे 11 जण जिल्हय़ात अडकले होते. त्यांनाही हैदराबाद येथे जाण्यास परवानगी देण्यात आली आहे. तर जवाहर नवोदय विद्यालयाच्या व मूळच्या उत्तरप्रदेशमधील 28 विद्यार्थ्यांना त्यांच्या मूळ गावी जाण्यासाठी प्रवास करण्यास परवानगी देण्यात आली आहे. जिल्हय़ात अजूनही काही अडकलेल्या विद्यार्थी, कामगार, पर्यटक आदी मूळ गावी जाऊ इच्छिणाऱयांसाठी तयार करण्यात आलेल्या व जिल्हय़ात येऊ इच्छिणाऱयांसाठी तयार करण्यात आलेल्या अशा दोन्ही लिंकवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. परवानगी मिळताच या सर्वांना त्यांच्या मूळ गावी रवाना करण्यात येणार आहे. गोवा राज्यात अडकलेल्या सिंधुदुर्ग जिल्हय़ातील व्यक्तींना जिल्हय़ात परत आणण्यासाठीचा प्रस्ताव गोवा शासनाकडे सादर करण्यात आला आहे. त्याला मंजुरी मिळाल्यानंतर सदर व्यक्तींना जिल्हय़ात परत आणण्यात येणार आहे. याशिवाय हॉटस्पॉट वगळून परराज्यात व परजिल्हय़ात अडकलेले जिल्हय़ातील जे लोक जिल्हय़ात परत येऊ इच्छितात, त्यांच्याविषयीचे प्रस्तावही संबंधित जिल्हाधिकाऱयांकडे पाठविण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हाधिकाऱयांनी दिली.