11 जणांवर गुन्हा दाखल
वार्ताहर/ संगमेश्वर, खेड
तालुक्यातील 62 ग्रामपंचायतीच्या निवडणुका शुक्रवारी पार पडल्या, मात्र या निवडणुकीमध्ये कुरधुंडा येथे दोन गटात झालेल्या बाचाबाचीमुळे गालबोट लागले. कुरधुंडा येथे बुथसमोर दोन गटात झालेल्या बाचाबाचीमुळे 11 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच खेड-चिंचघर येथही मतदानाचा हक्क बजावून घरी जात असताना एकास शिवीगाळ व दमदाटी करत मारहाण केल्याप्रकरणी माजी आमदार संजय कदम यांच्या पुतण्यांसह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांमध्ये शौकत अलजी, तैमूर अलजी, समीर हुसेन अलजी, इब्राहिम अलजी, शाहरुख मुकादम, शाकिर अलजी, रजा अलजी, असगर अलजी, कैस मालगुंडकर, राहिल मालगुंडकर, शफीक अलजी आदी 11 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. या बाबत संगमेश्वर पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, कुरधुंडा मोहल्ल्यामध्ये दुपारी 2च्या दरम्यान पोलीस आणि पोलीस पाटील मतदारांच्या रांगा लावत असताना यावेळी बुथसमोर कुरधुंडा मोहल्ला ते हायस्कूलकडे जाणाऱया रोडवर बुधवरुन मतदान करुन गेलेले व मतदान करण्यासाठी आलेले असे 15 ते 20 जण जमा होवून बाचाबाची करीत होते. याचवेळी डय़ुटीवर असलेल्या पोलीस सिया घाग आणि कुरधुंडा गावच्या पोलीस पाटील नसिफा फकीर या ही तेथे उपस्थित होत्या. बुथवर बाचाबाची होत आहे, हे समजल्यावर त्यांनी सर्वांना शांत राहण्यास सांगितले. परंतु कोणीही ऐकले नाही. दोन गटात एकमेकांविरुध्द झटापट आणि आरडाओरड सुरु होती. यामध्ये शाहरुख मुकादम यांना किरकोळ दुखापत झाली. तर तसेच राहिल मालगुंडकर याचा शर्ट फाटला. या प्रकरणी सिया विक्रांत घाग यांनी संगमेश्वर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून दोन गटातील 11 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चिंचघर येथे एकास मारहाण
मतदानाचा हक्क बजावून घरी जात असताना तिघांनी शिवीगाळ व दमदाटी करत मारहाण केल्याची तक्रार वसंत बयाजी शेलार (रा. चिंचघर-प्रभुवाडी) यांनी येथील पोलीस स्थानकात नोंदवली आहे. त्यानुसार माजी आमदार संजय कदम यांच्या पुतण्यांसह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संग्राम सतीश कदम, पिंटय़ा सतीश कदम, प्रसाद दिलीप कदम (तिघे रा. चिंचघर-प्रभुवाडी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. या बाबत वसंत शेलार यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, तिघांनी हातातील काठीने मारहाण करत शिवीगाळ केली. याशिवाय मुलगा रोशन यालादेखील लाथा-बुक्क्यांनी मारहाण करत दुखापती केल्या. त्यानुसार तिघांवर भादंवि कलम 452, 324, 504, 506, 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.