महापालिका हद्दीतील नावे दाखल करण्यात आल्याच्या तक्रारीची दखल
प्रतिनिधी / बेळगाव
महापालिकेची हद्दवाढ 2007 मध्ये करण्यात आल्यानंतर हिंडलगा ग्राम पंचायतमधील काही भागाचा समावेश करण्यात आला होता. मात्र या भागातील मतदारांची नावे ग्राम पंचायत आणि महापालिका अशा दोन्ही ठिकाणी असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे याबाबत प्रातांधिकाऱयांकडे तक्रार करण्यात आल्याने मतदारयादीच्या चाचपणीस प्रारंभ करण्यात आला आहे.
महापालिकेची हद्दवाढ करण्यात आल्यानंतर विनायकनगर, टीचर्स कॉलनी, झटपट कॉलनी, लक्ष्मी टेकडी, सिंधी कॉलनी, जयनगर अशा विविध भागांचा समावेश महापालिकेत करण्यात आला आहे. परिसरातील मतदारांची नावे महापालिका आणि ग्राम पंचायत अशा दोन्ही ठिकाणांच्या यादीत समाविष्ट करण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. 2014 मध्ये याबाबत निवडणूक विभागाकडे तक्रार करण्यात आली होती. याची दखल घेऊन शेकडो नावे ग्राम पंचायतींच्या यादीमधून कमी करण्यात आली होती. पण आता पुन्हा हिंडलगा ग्राम पंचायतीच्या यादीमध्ये महापालिका हद्दीतील तीन-चार हजार नावे असल्याचे निदर्शनास आले आहे. हिंडलगा हद्दीतील नागरिकांची नावे महापालिकेच्या मतदार यादीत घालण्यात आल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे महापालिका आणि ग्राम पंचायत हद्द परिसरातील रहिवाशांची नावे दोन्ही मतदारयादीत असल्याचे निदर्शनास आले आहे. याबाबत प्रांताधिकाऱयांकडे लेखी तक्रार करून महापालिका हद्दीतील रहिवाशांची नावे हिंडलगा ग्राम पंचायत मतदार यादीमधून कमी करण्यात यावीत, अशी मागणी करण्यात आली होती. या तक्रारीची दखल घेऊन ग्राम तलाठी व बीएलओ यांनी स्थानिक रहिवाशांची बैठक घेऊन मतदारांबाबत माहिती घेतली. ग्राम पंचायत आणि महापालिका मतदार यादीतील नावांची पडताळणी करण्यात आली. दोन्ही ठिकाणी नावे असल्याने याबाबत चाचपणीस प्रारंभ करण्यात आला आहे. दोन्ही ठिकाणी असलेल्या नावांची माहिती घेऊन महापालिका हद्दीतील नावे ग्राम पंचायत मतदार यादीमधून कमी करण्यात येणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.