घरपट्टी भरण्यासाठी बुडा कार्यालयात गर्दी
प्रतिनिधी /बेळगाव
महापालिकेप्रमाणेच बुडाच्यावतीने मालमत्ताधारकांना घरपट्टीवर पाच टक्के सवलत देण्यात येते. एप्रिल महिन्यात मालमत्ता कर भरणा करून पाच टक्के सवलतीचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनी घरपट्टी भरण्यासाठी बुडा कार्यालयात गर्दी केली होती. 30 एप्रिलपर्यंत घरपट्टीवरील सवलतीचा लाभ मिळणार आहे.
बुडाने अनेक वसाहती निर्माण केल्या असून रामतीर्थनगर वगळता सर्व रहिवासी वसाहती महापालिकेकडे हस्तांतर केल्या आहेत. कुमारस्वामी लेआऊट वसाहत अलिकडेच महापालिकेकडे हस्तांतर केली आहे. त्यामुळे या वसाहतीमधील घरपट्टी महापालिका जमा करणार आहे. सध्या बुडाला रामतीर्थनगरमधील मालमत्ताधारकांकडून घरपट्टी मिळते. दरवषी 40 लाख रुपये घरपट्टीतून बुडाला मिळतात. एप्रिल महिन्यात आगाऊ कर भरणा करणाऱया मालमत्ताधारकांना महापालिकेप्रमाणेच पाच टक्के कर सवलत देण्यात येते. त्यामुळे सवलतीचा लाभ घेण्यासाठी बुडा कार्यालयात गर्दी होत आहे.