धर्मवीर संभाजी चौकाजवळील घटना
प्रतिनिधी /बेळगाव
बेळगाव-देवगणहट्टी भरधाव बसने धर्मवीर संभाजी चौकजवळ दोन वाहनांना ठोकरले. मद्यधुंद अवस्थेत बेजबाबदारपणे बस चालविणाऱया बसचालकामुळे हा प्रकार घडला आहे. यात एक कार आणि हौदा रिक्षाचे किरकोळ नुकसान झाले आहे. दरम्यान, या प्रकारामुळे रस्त्यावर वाहतुकीची कोंडी झाली होती.
मद्य प्राशन करून बस चालविणाऱया चालकाने हा प्रकार घडल्यानंतर तेथून पलायन केले. बस रस्त्यावरच राहिल्याने वाहतुकीची केंडी झाली होती. दरम्यान पोलिसांनी बस ताब्यात घेतली. रस्ता खुला झाल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.
बसचालकाला समज देण्याची मागणी
परिवहन मंडळाचे बसचालक आणि वाहक सातत्याने चर्चेत असतात. चार दिवसांपूर्वी राष्ट्रीय महामार्गावर प्रवासी आणि बसचालकाच्या वादावादीमुळे वाहतूक ठप्प झाली होती. त्यानंतर मंगळवारी पुन्हा बेजबाबदार बसचालकामुळे दोन वाहनांचे नुकसान झाले आहे. परिवहनचे बसचालक भरधाव बस चालविणे, थांब्यावर बस न थांबविणे, मद्यधुंद अवस्थेत बस चालविणे, प्रवाशांशी वाद घालणे, असे प्रकार सातत्याने घडत आहेत. त्यामुळे बसचालक आणि वाहकांना समज द्यावी, अशी मागणी प्रवाशांतून होत आहे.