मैत्रिणींनो, सध्याच्या काळात गरोदरपण साजरं केलं जातं. विविध क्षेत्रातल्या सेलिब्रिटीज हा काळ एंजॉय करताना दिसतात. गरोदरपण हे ओझं न मानता मस्तपैकी मिरवून घेतात. छान छान कपडे घालतात, फॅशन करतात. करीना कपूरपासून समीरा रेड्डीपर्यंत अनेकींनी गरोदरपणात खूप धमाल केली, लोकांसमोर आल्या. त्यांच्याकडून आपणही प्रेरणा घेऊ शकतो. या दिवसात आनंदी, उत्साही राहणं गरजेचं असतं. मनात सकारात्मक विचार यायला हवेत. म्हणूनच तुम्ही वेगवेगळी फॅशन करू शकता. वेगवेगळ्या प्रकारचे कपडे घालून स्वतःचा उत्साह वाढवू शकता. या दिवसात कोणती फॅशन करायला हवी? जाणून घेऊ.
- गरोदरपणात पोट आणि वजन वाढतं. त्यामुळे या दिवसात खरेदी केलेले कपडे नंतर बाद होतात. हे टाळण्यासाठी तुम्ही रॅप ड्रेसेस खरेदी करा. रॅप ड्रेसेस स्ट्रेचेबल आणि ऍडजस्टेबल असतात. त्यामुळे प्रसूतीनंतर वजन कमी झालं तरी तुम्ही ते वापरू शकता. रॅप टॉप्सही मिळतात. तुम्ही हे टॉप्सही वापरू शकता.
- या दिवसात फ्लोरल प्रिंट कॅरी करता येईल. उन्हाळ्यात फ्लोरल प्रिंटची चलती असते. फ्लोरल प्रिंटवाले मॅक्सी ड्रेस, लाँग स्कर्ट, फ्रॉक्स घालता येतील. हे ढगळ कपडे आरामदायीही असतात. कॉटन मटेरियलचे कपडे खरेदी करा. कॉटनवर फ्लोरल प्रिंट उठून दिसतात.
- तुमच्याकडे वन पीसचा पर्यायही आहे. वेगवेगळ्या डिझाइन्सचे, स्टाईल्सचे वन पीस कॅरी करता येतील.
- आरामदायी आणि ट्रेंडी लूकसाठी टँक ड्रेसेसही ट्राय करता येतील. ट्रँक ड्रेस आरामदायी असतात. त्यामुळे हे कपडे गरोदरपणात घालता येतील. हे ड्रेस कुठेही कॅरी करता येतील.