महिलेची पोलिसात धाव, टॅक्स भरुन कमिशन देण्याचे अमिष दाखवून पैसे उकळले
प्रतिनिधी / मिरज
घर बसल्या आपल्याच मोबाईलवर ऑनलाईन पार्ट टाईम काम करा. जेवढे काम तेवढे दाम असे अमिष दाखवून शहरातील ब्राम्हणपूरी येथे राहणाऱ्या रुपाली राजेंद्र संगवे या महिलेला तब्बल नऊ लाख रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे. याबाबत सदर महिलेने मिरज शहर पोलिसात धाव घेऊन तक्रार दिली आहे. पोलिसांनी ऑनलाईन फसवणूक करणाऱया अज्ञात ठग्यावर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, ब्राम्हणपूरी येथील पाठक हॉस्पिटलजवळ राहणाऱ्या रुपाली संगवे यांना 10 जुलै रोजी चार वेगवेगळ्या प्रकारच्या मोबाईल क्रमांवर एसएमएस आले. त्याद्वारे वर्क फ्रॉम होम पार्ट टाईम डेली सॅलरीज ऑफ रुपीज, नो टाईम लिमिट, नो फिज अशा आशयाचा तो संदेश होता. या शिवाय जेवढे काम कराल तेवढे कमिशन थेट बँक खात्यावर जमा होतील. असे अमिषही दाखविण्यात आले. सुरुवातीला ठग्यांनी संगवे यांच्या खात्यावर 14 रुपये ई-चॅट ऍफ्लीकेशनद्वारे जमा झाल्याचे सांगितले.
परंतू हे पैसे बँक खात्यावर जमा न झाल्याने संगवे यांनी संबंधीत व्यक्तीला फोन करुन विचारणा केली. त्यावेळी समोरुन बोलणाऱ्या व्यक्तीने कमिशन खात्यावर जमा होण्यासाठी टॅक्स भरावा लागेल, तसे केल्यास तुम्हाला 11 लाख रुपये मिळतील, असे सांगितले. संबंधीत भामट्य़ाच्या बोलण्यावर विश्वास ठेवून रुपाली संगवे यांनी पेटीएम आणि फोनपेच्या माध्यमातून वारंवार नऊ लाख रुपये पाठविले. मात्र, तरीही संगवे यांना कमिशन देण्यास टाळाटाळ केली जात होती. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे संगवे यांच्या लक्षात आले. याबाबत त्यांनी शहर पोलिसात धाव घेऊन फसवणूक झाल्याची तक्रार दिली आहे.