प्रतिनिधी / सातारा :
वायसी कॉलेज येथे असणाऱ्या निर्भया पोलीस चौकीतील पोलीस कर्मचारी सुहास कदम यांना कर्तव्यावर असताना आरोपी हर्षल चिकणे याने मुलांमध्ये झालेल्या किरकोळ वादात हस्तक्षेप करत मुलांना निर्भया चौकीत बोलवल्याचा राग मनात धरून पोलीस कर्मचारी कदम यांना शिवीगाळ करत मारहाण केली. यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याने तो फरार झाला होता. त्याला चार तासात पकडण्यात शहर पोलिसांना यश आले.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक गणेश वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक तयार करण्यात आले होते. त्या पथकाने आरोपीं हर्षल चिकणेचा शोध घेवून त्याला 4 तासात ताब्यात घेतले. त्याच्यावर पुढील कारवाईसाठी सातारा शहर पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले आहे. समाजातील अशा प्रकारच्या समाजकंटक लोकांच्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याने या आरोपीविरूद्ध कठोर कारवाई करण्यात येणार आहे.