घरोघरी साठणारा वैद्यकीय-सॅनिटरी पॅडसारख्या कचऱयाची उचल करण्यासाठी वेगळी सुविधा उपलब्ध
प्रतिनिधी/ बेळगाव
शहरात विविध 16 प्रकारचा कचरा निर्माण होतो. पण वैद्यकीय कचरा आणि सॅनिटरी पॅड आदी कचरा घातक कचरा म्हणून ओळखला जातो. घरोघरी साठणारा वैद्यकीय कचरा व सॅनिटरी पॅडसारख्या कचऱयाची उचल करण्यासाठी वेगळी सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. यामुळे ओल्या आणि सुक्मया कचऱयाप्रमाणे घातक कचरा नागरिकांना वेगळा बांधून द्यावा लागणार आहे.
केवळ रुग्णालयांमधील घातक कचऱयाची उचल करण्याची सुविधा उपलब्ध आहे. मात्र घरोघरी आणि लहान दवाखान्यांमध्ये साचणाऱया कचऱयाची उचल करण्याची सुविधा उपलब्ध नव्हती. यामुळे घरांमध्ये साचणारा वैद्यकीय कचरा व सॅनिटरी पॅड कचराकुंडीत टाकण्यात येत आहे. घरी वैद्यकीय उपचाराकरिता वापरण्यात येणारे इंजेक्शन, टाकाऊ कॉटन, औषधाच्या बाटल्या, शिल्लक असलेली औषधे अशा प्रकारचा वैद्यकीय कचरा कुंडीत, रस्त्याशेजारी किंवा गटारीमध्ये टाकला जातो. यामुळे कचऱयाची उचल करताना स्वच्छता कामगारांना धोकादायक ठरत आहे. अशा प्रकारचा कचरा जाळला जात असल्याने त्यामधून निघणारे विषारी वायू नागरिकांना घातक ठरत आहेत. कचऱयावर प्रक्रिया करताना इंजेक्शनच्या सुई, सलाईनच्या सिरींज आदी टोकेरी साहित्य जीवघेणे बनत आहे. गटारीमध्ये टाकण्यात येणारे इंजेक्शन आणि सलाईन सिरींज पाण्यामधून वाहून नाल्याद्वारे शेतवडीमध्ये पसरत असतात. यामुळे शेतात काम करणाऱया कामगारांना याचा धोका निर्माण झाला आहे. सॅनिटरी पॅड व लहान बाळाचे पॅडदेखील दररोजच्या कचऱयात टाकण्यात येत असल्याचे निदर्शनास आले आहे. पण घरोघरी निर्माण होणारा घातक कचरा उचल करण्याची कोणतीच सुविधा महापालिका प्रशासनाने उपलब्ध केली नव्हती. यामुळे नागरिकांना हा कचरा देण्याची अडचण भासत होती.
आता अशा प्रकारचा वैद्यकीय आणि घातक कचरा उचल करण्याची सुविधा महापालिका प्रशासनाने उपलब्ध केली आहे. ओला आणि सुका कचरा वेगवेगळा जमा केला जातो, त्याप्रमाणे वैद्यकीय कचरा उचल करण्याची सुविधा उपलब्ध केली असून दैनंदिन कचरा उचल करणाऱया वाहनांमध्ये तशी व्यवस्था करण्यात आली आहे. महापालिकेच्या कचरावाहू वाहनात ओला, सुका आणि घातक कचरा जमा करण्याची तरतूद करण्यात आली आहे. पण वैद्यकीय कचरा आणि सॅनिटरी पॅड आदी कचरा वेगळा बांधून स्वच्छता कामगारांकडे देताना त्याबाबतची सूचना त्यांना देणे आवश्यक आहे. घातक कचरा रस्त्याशेजारी, कचराकुंडीत आणि गटारीत टाकण्याऐवजी घरोघरी येणाऱया स्वच्छता कामगारांकडे द्यावा, असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.