अक्कलकोट / प्रतिनिधी
अक्कलकोट तालुक्यातील संगोळगी (अ) येथे चंदनाच्या झाडांची तोड करणारे दोन चोरटे स्थानिक बांधकाम मजुरांनी रंगेहाथ पकडले. ही घटना दि २५ रोजी सकाळी १० च्या दरम्यान सुमारास उघडकीस आली याबाबत दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत चालू होते.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, संगोळगी ( अ ) येथील अनिल शरणप्पा पाटील यांच्या स्वतःच्या मालकीच्या शेतातील बांधावरील ८ ते ९ वर्षाचे चंदन वृक्ष दोन अनोळखी लोकांनी तोडून नेत असल्याचे शेतात काम करणाऱ्या बांधकाम मजुरांना दिसून आल्याने या लोकांनी दोन चोरट्यांना रंगेहाथ पकडले. यावेळी चंदन चोर व स्थानिक मजुरामध्ये झटापट झाली. सुनील दतु पवार वय ३५,व परमेश्वर तुळशीदास जाधव वय २३ दोघे रा. औसा जि. लातूर असे चंदन चोरी करणाऱ्या चोरट्यांची नावे आहेत. वरील दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. याबाबत फिर्याद अनिल शरणप्पा पाटील यांनी दिली असून रात्री उशीरापर्यंत गुन्हा नोंद करण्याचे काम चालू होते. पुढील तपास पोलीस करीत आहेत.