प्रतिनिधी / कुडचडे :
कुडचडे येथील चंदेरी महोत्सवात दयानंद कला केंद्रातर्फे घेण्यात आलेल्या चंदेरी सुंदरी सौंदर्यराणी कु. सानिशा फळदेसाई हिने चंदेरी क्वीन किताब व रोख 7 हजार रुपयांचे पहिले बक्षीस पटकाविले. इडन बॅनेट हिला पाच हजार रुपयांचे दुसरे बक्षीस प्राप्त झाले. स्पर्धेत अकरा युवतींनी आपले सौंदर्य प्रदर्शन, रॅम्प वॉक, स्पॉट टॉक व परीक्षकांनी विचारलेल्या प्रश्नांना चपखल उत्तरे देऊन रसिकांची मने जिंकली.
विजेत्या सौंदर्यवती राणी कु. सानिशा फळदेसाई व इडन बॅनेट यांना कला व संस्कृती खात्याचे माजी संचालक मोर्तू नाईक यांनी रुपेरी मुकुट घालून आणि चंदेरी क्वीन सेश घालून शुभेच्छा दिल्या. स्पर्धेचे परीक्षण व निवेदन राष्ट्रीय कीर्तीच्या आणि गोव्यात अनेक सौंदर्यस्पर्धा ज्ंिांकलेल्या सिमरन हळर्णकर लोटलीकर हिने केले. त्यांच्या मातोश्री सौ. हळर्णकर ज्या मूळ खामामळ कुडचडे येथील जयंती फडते, ज्यांनी यापुर्वी दयानंद कला केंद्राच्या अनेक नृत्य, नाटय़ अशा अनेक उपक्रमांमध्ये सहभागी होऊन योगदान दिले होते, त्या यावेळी खास उपस्थित होत्या. त्यांनी आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला.
सिमरन यांनी या स्पर्धेच्या आयोजनासाठी खूप सहकार्य केल्याबद्दल दयानंद कला केंद्राचे सचिव बंटी उडेलकर यांनी त्यांचे आभार व्यक्त केले. चंदेरी महोत्सवामुळे आपल्या कुडचडय़ाशी असलेल्या नात्याला उजाळा मिळाला. आपण यापुढच्याही चंदेरी महोत्सवास शुभेच्छा देते, असे सिमरन यावेळी बोलताना म्हणाल्या.