चंद्राच्या प्रकाशाला ट्रफिक सिग्नल समजण्याची चूक
एलन मस्क यांची इलेक्ट्रिक कार कंपनी टेस्ला जगभरात स्वतःच्या अद्भत कार्ससाठी प्रसिद्ध आहे. या वाहनांचे डिझाइनच नव्हे तर त्यातील फिचर्स देखील अन्य वाहनांपेक्षा वेगळी आहेत. टेस्लाने सेल्फ-ड्रायव्हिंग फीचरसह कार सादर केली असता जगभरात त्याची चर्चा झाली. अनेक लोकांनी याला धोकादायक ठरविले तर अनेकांनी भविष्यातील गरज असे संबोधिले. पण आता सोशल मीडियवर एक व्हिडिओ व्हायरल होत असून यात ऑटो पायलट मोडवर धावणारी टेस्ला कार आकाशातील चंद्राला ट्रफिक सिग्नलचा पिवळा सिग्नल समजून चूक करत असल्याचे दिसून येते.
हा व्हिडिओ जॉर्डन नेल्सन यांनी शेअर केला आहे. “एलन मस्क तुमच्या टीमला सांगू इच्छितो की चंद्र तुमच्या कारच्या ऑटोपायलट सिस्टीमला मूर्खात काढत आहे. या कारला चंद्र ट्रफिक सिग्नल समजून स्वतःचा वेग कमी करत आहे’’ असे जॉर्डन यांनी नमूद केले आहे.
या 23 सेकंदांच्या व्हिडिओत चंद्राच्या प्रकाशाला कार सातत्याने ट्रफिक सिग्नलच्या स्वरुपात स्क्रीनवर दाखवित असल्याचे दिसून येत. यामुळे कुठलाही ट्रफिक सिग्नल नसतानाही कारचा वेग कमी होतो. या कराच्या अल्गोरिदममुळे असे घडल्याचे काही सोशल मीडिया युजर्सचे मानणे आहे. जॉर्डन यांनी ट्विटरवर व्हिडिओ अपलोड करत एलन मस्क यांनाही टॅग केले आहे.
टेस्ला कंपनीने अलिकडेच कार खरेदी केल्यास दर महिन्याला 199 डॉलर्सची रक्कम भरून फुल सेल्फ ड्रायव्हिंग फीचर्स प्राप्त करता येणार असल्याची घोषणा केली होती. यापूर्वी लोकांना या फीचरसाठी कार खरेदी करतेवेळी 10 हजार डॉलर्स द्यावे लागत होते.