प्रतिनिधी /फोंडा
फोंडा शहर व शहराला जोडणाऱया सर्व अंतर्गत रस्त्यांची दाणादाण उडालेली आहे. फोंडा शहर व आसपासच्या पंचायत क्षेत्रातील मुख्य व अंतर्गत रस्त्यांची चाळण झाली असून खराब रस्त्यांमुळे वाहनचालकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. चतुर्थीपुर्वी खड्डय़ाची तात्पुरती डागडुजी करावी, अशी मागणी वाहन चालकांनी केली आहे.
बुधवारपेठ फोंडा ते जुने बसस्थानक हा रस्ता कायम वाहतुकीने गजबजलेला असतो. मागील सहा वर्षांपासून फोंडा शहरात मलनिस्सारण प्रकल्पाचे काम संथगतीने सुरू आहे. ते कधी संपणार याबाबत मलनिस्सारण अधिकारी प्रत्येक वेळी 90 टक्के काम पूर्ण झाल्याचे सांगतात. फोंडय़ातील लोकप्रतिनिधी या विषयावर बोलण्यास टाळतात. अनेक ठिकाणी मलनिस्सारणाच्या खोदकामानंतर रस्ता व्यवस्थित न बुजविल्यामुळे धोकादायक बनला असून वाहनचालकांना तोल सांभाळीत वाहने हाकावी लागत आहेत. मलनिस्सारणासाठी पाईप जोडणी झालेल्या रस्त्याचे हॉटमिक्स डांबरीकरणानंतरही रस्ता उखडणे, फेर खोदकामाचे सत्र सुरू असल्यामुळे हा प्रकल्प कार्यान्वित होईपर्यंत कुठे खोदकाम होईल, याचा भरोसा नाही.
गोवा बागायतदार, काजीवाडा, कुर्टी येथे खड्डेमय रस्ता
गोवा बागायतदार बाजार, बोरकर पेट्रोलपंप येथे खड्डेमय रस्त्यावर वाहनचालकांच्या कमरेला बराच त्रास होत आहे. दाग फोंडा येथे मलनिस्सारण प्रकल्पाच्या चेंबरसाठी काम अर्धवट स्थितीत असल्याने एकल मार्ग अशी परिस्थिती उद्भवलेली आहे. कुर्टी फोंडा येथील व्हॉलेस फार्मास्युटिकलसमोर खडय़ात पाणी साचत असल्यामुळे वाहनचालकांचा अंदाज चुकत आहे. चतुर्थीच्या माटोळी बाजारहाटीसाठी येत्या आठवडय़ापासून ग्राहकांची व वाहनचालकांची रेल वाढणार यावेळी वाहतूक कोंडीतून खड्डेमय रस्त्यातून वाट शोधावी लागणार आहे. रस्त्याची डागडुजी होईपर्यंत फोंडा शहरातील रस्त्यावरून कसरत करून जाण्याशिवाय पर्याय नाही.