इंदापूर / प्रतिनिधी :
पुण्यातील ‘चपराक प्रकाशन’ने गुरुपौर्णिमेच्या पूर्वसंध्येला इंदापूर तालुक्यातील श्रावणबाळ आश्रम शाळेला सव्वा लाख रुपये किमतीची पुस्तके मदत म्हणून दिली आहेत. आर्थिक विवंचनेत असतानाही स्वाभिमान जपणाऱ्या या संस्थेला ‘चपराक प्रकाशन’चे प्रमुख घनश्याम पाटील यांनी मदत केली आहे. ज्येष्ठ लेखक, इतिहास संशोधक संजय सोनवणी यांच्या हस्ते ही पुस्तके श्रावणबाळ आश्रम शाळेला रवाना करण्यात आली.
श्रावणबाळ आश्रम शाळेचे प्रमुख ह.भ. प. राजीव करडे यांनी सहा वर्षापूर्वी संस्थेची स्थापना केली. यामध्ये राज्यभरातील अनाथ तसेच बेघर मुले निवासासाठी आहेत. मात्र, शाळेचे प्रमुख करडे यांनी कोणतीही शासकीय अथवा वैयक्तिक स्वरुपाची मदत स्वीकारली नाही. संगीत क्लास, कापडी पिशव्या शिवून मिळणाऱ्या उत्पन्नातून ते ही आश्रमशाळा चालवतात. मात्र, तीन महिन्याच्या लॉकडाऊनमुळे संस्था आर्थिक अडचणीत सापडली होती. त्यामुळे ‘चपराक प्रकाशन’च्या घनश्याम पाटील यांच्याकडे सवलतीच्या दरात पुस्तकांची मागणी केली होती. मात्र क्षणाचाही विलंब न करता घनश्याम पाटील यांनी ‘चपराक’ने प्रकाशित केलेले तब्बल सव्वा लाख रुपये किमतीचे ग्रंथ मदत स्वरूपात दिल्याने त्याच्या विक्रीतून आश्रमशाळेला मोठा हातभार लागणार आहे.