बेंगळूर/प्रतिनिधी
राज्यात सरकारी अधिकारी आणि राजकीय नेत्यांना कोरोनाची लगान झाली आहे. कर्नाटकचे आरोग्य आयुक्त पंकज कुमार पांडे यांनी कोरोना चाचणी केली होती. सोमवारी त्यांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला आहे. आयुक्त पांडे यांच्या कार्यालयातील एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाली होती. यांनतर पांडे यांनी स्वतःची कोरोना चाचणी करून घेतली. कोरोना अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर आयुक्त पांडे यांनी त्यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह यावी यासाठी प्रार्थना करणाऱ्या सर्वांचे आभार मानले आहेत. तसेच त्यांनी माझा कोरोना अहवाल निगेटिव्ह आहे आणि मी या साथीच्या रोगाविरुद्धलढण्यासाठी तयार आहे असे म्हणत त्यांनी राज्यातील सर्व जनतेला काळजी घेण्याचे आवाहनही केले आहे.
याचबरोबर कर्नाटक प्रदेश कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष दिनेश गुंडू राव आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचीही कोरोना चाचणी केली असता त्या सर्वांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. दिनेश गुंडू राव यांच्या निवासस्थानी तैनात असलेल्या पोलीस सुरक्षा रक्षकाला कोरोनाची लागण झाली आहे. त्याला कोरोनाची लागण झाल्याचे समजल्यानंतर दिनेश गुंडू राव यांच्या कुटुंबीयांचीही कोरोना चाचणी केली. तपासणीनंतर सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
तसेच बेंगळूरमधील गांधीनगर मतदारसंघाच्या आमदाराच्या घरी असणाऱ्या एका बंदूकधारी आणि घरकाम करणाऱ्या दोन कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. पण पत्नी, दोन मुली आणि आपण स्वतः निगेटिव्ह असल्याचे आमदारांनी सांगितले आहे. तसेच आम्ही सर्वजण सरकारी नियमांनुसार 14 दिवसांसाठी स्वतंत्र राहू, असे म्हंटले आहे.