प्रतिनिधी/ मडगाव
गोव्यात महिला व खास करून तरूणी सुरक्षित आहे का ? असा सवाल उपस्थिती होण्याजोगी परिस्थिती सद्या निर्माण झालेली आहे. काल मंगळवारी सकाळी 9.30च्या दरम्यान चांदर येथे स्कुटरवरून आपल्या कामावर जाणाऱया केपे येथील एका युवतीला दोघां तरूणांनी वाटेत अडवून तिच्याकडे स्कुटरची मागणी केली. यावेळी त्यांना प्रतिकार केल्याने त्या तरूणीला जबरदस्तीने ‘डेटॉल’ (जंतू नाशक) पाजण्याचा भयानक प्रकार घडला. या प्रकरणी मायणा-कुडतरी पोलीस स्थानकात तक्रार नोंद केली आहे.
उपलब्ध माहिती प्रमाणे, केपे येथील एक 18 वर्षाची तरूणी चांदर येथील एका ब्युटी पार्लरमध्ये नोकरी करीत असून काल सकाळी केपेहून ती चांदरला येत असताना चांदर चर्चजवळ दोन तरूणांनी आपली पल्सर मोटारसायकल तिच्या स्कुटरच्या समोर आडवी करून तिला रोखले व तिच्याकडे स्कुटरची मागणी केली. त्यावेळी या तरूणीने स्कुटर देण्यास नकार केला व त्यांना प्रतिकार केला. यावेळी या दोन्ही युवकांनी तिला पकडून सोबत आणलेले ‘डेटॉल’ तिच्या तोंडात घातले व जबरदस्तीने प्यायला भाग पाडले. यावेळी या तरूणीने मदतीसाठी आरडा-ओरडा केला असता हे युवक घटनास्थळावरून पळून गेले.
हे युवक पळून गेल्यानंतर ही तरूणी काम करीत असलेल्या ब्युटी पार्लरमध्ये आली व घडलेला प्रकार तिने ब्युटी पार्लरच्या मालकिणीला सांगितला. यावेळी या युवतीने उलटी देखील केली. नंतर तिला तातडीने कुडतरी प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. तिचे तिच्यावर प्राथमिक उपचार करून तिला मडगावच्या हॉस्पिसियो इस्पितळात पाठवून देण्यात आले. सद्या तिच्यावर हॉस्पिसियोत उपचार सुरू तिला 24 तास निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे.
या युवतीला अडविणारे दोन्ही युवक हिंदी बोलत होते. ते स्थानिक नसावे अशी शक्यता देखील या तरूणीने व्यक्त केली आहे. या घटणेची कल्पना सुरवातीला चांदर आऊट पोस्टला देण्यात आली. यावेळी हे प्रकरण पुढे न्यायचे आहे का असा सवाल डय़ुटीवरील पोलिसांनी उपस्थितीत केल्याने, पोलिसांच्या कार्यपद्धतीवर देखील नाराजी व्यक्त करण्यात आलेली आहे. हे प्रकरण पुढे न्यायचे असून दोन्ही युवकांना अटक व्हायलाच पाहिजे अशी मागणी ब्युटी पार्लरच्या मालकिणीने तसेच तरूणीच्या आईने देखील केली आहे.
सद्या या प्रकरणाचा तपास मायणा-कुडतरी पोलीस करीत असून काल त्या तरूणींवर वैद्यकीय उपचार सुरू असल्याने संपूर्ण जबानी घेणे पोलिसांना शक्य झालेले नाही. आज मंगळवारी तिच्याकडून माहिती घेतल्यानंतर त्या युवकांचा शोध घेतला जाणार असल्याची माहिती मायणा-कुडतरी पोलिसांनी दिली.
चांदर येथे दोन रस्ते असून एका रस्त्यावर नेहमीच ट्रकांची वर्दळ असते, त्यामुळे ट्रकांची वर्दळ नसलेल्या रस्त्याने जाणे या तरूणीने पसंत केले होते. मात्र, या रस्त्यावर वाहनाची किंवा माणसांची वर्दळ नसल्याचे पाहून त्या दोन युवकांनी या तरूणीला अडविले व तिला डेटॉल पाजले. भविष्यात असे प्रकार अन्य महिला किंवा तरूणींच्या बाबतीत घडू नये, यासाठी पोलिसांनी त्वरित त्या दोन्ही युवकांना अटक करावी अशी मागणी पिढीत तरूणींच्या कुटूंबियांनी केली आहे.