पोलादपूरनजीक महामार्गावरचा प्रकार
प्रतिनिधी/ खेड
मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटालगत धामणदिवीनजीक पहाटेच्या सुमारास खासगी आरामबसमध्ये चाकरमान्यांना लुटण्याचा खळबळजनक प्रकार घडला. पोलादपूर पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने राबवलेल्या कॉम्बिग ऑपरेशनमध्ये अशोक धर्मराज जाधव (45, उंबरा-उस्मानाबाद) याच्या मुसक्या आवळण्यात आल्या. मात्र त्याचे 5 साथीदार फरार असून दोन वाहने पोलिसांनी जप्त केली आहेत. गुहागरला येणाऱया या बसमधील 8 प्रवाशांचा 24 हजार 500 रूपये किंमतीचा ऐवज चोरीस गेला आहे.
अशोक धर्मराज जाधव (45, उंबरा-उस्मानाबाद) असे गजाआड करण्यात आलेल्या दरोडेखोराचे नाव आहे. हरी शहाजी शिंदे, अनिल लालासाहेब शिंदे, उत्तम सुंदर शिंदे, दत्तात्रय लालासाहेब शिंदे, संतोष पवार (सर्व उंबरा-खामकरवाडी, उस्मानाबाद) अशी फरारींची नावे आहेत. हे सर्वजण फासेपारधी समाजातील असून पोलादपूर पोलिसांकडून फरारींचा कसून शोध घेण्यात येत आहे. ठिकठिकाणच्या पोलिसांना नाकाबंदीच्या सूचना करण्यात आल्या आहेत.
गुहागरला येत होती बस
बसचालक सुनील शंकर दामले (35, साखरी-गुहागर) हे पिंपळेश्वर ट्रव्हल्सच्या खासगी आरामबसमधून चाकरमान्यांना घेऊन मुंबईतून गुहागरला निघाले होते. पोलादपूर हद्दीतील धामणदिवीनजीक बस आली असता एका प्रवाशास धक्कादायक प्रकार निदर्शनास आला. अज्ञात व्यक्ती बसच्या डाव्या बाजुच्या डिकीतील प्रवाशांचे साहित्य रस्त्यावर टाकत असून खाली असलेली व्यक्ती ते उचलून नेत असल्याचे निदर्शनास आले. प्रवाशाने हा प्रकार चालकास सांगून बस थांबवण्यास सांगितले. तोपर्यत ती व्यक्ती व साथीदार साहित्य गोळा करून पसार झाले.
पाईपमध्ये लपला होता संशयित
याबाबत चालक दामले यांनी पोलादपूर पोलीस स्थानकात खबर दिल्यानंतर हवालदार दीपक जाधव, पोलीस नाईक रूपेश पवार, परेश मोरे, गणेश किर्वे, विनोद महाडिक आदींच्या पोलीस पथकाने तातडीने नाकाबंदी केली. धामणदिवीतील ग्रामस्थांच्या मदतीने कशेडी घाटाच्या दरीतील जंगलमय भागात कोम्बिंग ऑपरेशन राबवण्यात आले. यावेळी एका झाडालगतच्या पाईपमध्ये एक व्यक्ती लपल्याचे दिसून आले. पोलिसांनी विचारणा केली असता रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकचा चालक असल्याचे त्याने सांगितले.
ट्रकमध्ये झोपण्याऐवजी पाईपामध्ये का झोपला? याबाबतची शंका पोलिसांना आल्याने त्यास ताब्यात घेऊन पोलिसी हिसका दाखवला असता त्याने बसमधून प्रवाशांचे साहित्य चोरल्याची कबुली दिली. तसेच आपल्यासोबत आणखी पाच जण असल्याचे सांगून त्यांचे नावेही त्याने पोलीसांना सांगितले. बसमधून प्रवास करणाऱया 8 प्रवाशांचे घरगुती वापराचे कपडे, रोख रक्कम, गणपतीचे डेकोरेशनचे साहित्य असलेल्या बॅगा असा 24 हजार 500 रूपये किंमतीचा ऐवज चोरीस गेल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या व्यक्तीसह अन्य पाच संशयितांवर भादंवि कलम 379, 34 अन्वये पोलादपूर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत जाधव करत आहेत.
गणेशभक्त धास्तावले!
गणरायाचे आगमन अवघ्या 9 दिवसांवर येऊन ठेपले असून चाकरमानी खासगी वाहने, आरामबस व एस.टी. बसेसमधून गाव गाठत आहेत. मात्र मुंबईहून कोकणात येणाऱया खासगी आरामबसमधील चाकरमान्यांना लुटण्याचा प्रकार उघड झाल्यानंतर गणेशभक्तांच्या उरात धडकी भरली आहे. पोलादपूर पोलिसांनी अवघ्या काही तासांतच एका संशयिताच्या मुसक्या आवळल्याने चाकरमान्यांना दिलासा मिळाला असला तरी भय मात्र कायम आहे.