प्रतिनिधी/ बेळगाव
मध्यवर्ती बसस्थानकाजवळील एका वॉईन शॉपच्या व्यवस्थापकाला चाकूचा धाक दाखवत गल्ल्यातील रक्कम लुटल्याप्रकरणी मार्केट पोलिसांनी कसई खड्डा परिसरातील एका युवकाला अटक केली आहे.
गुरुवारी रात्री एका वॉईन शॉपमध्ये घुसून चाकूचा धाक दाखवत 7 हजार 500 रुपये पळविण्यात आले होते. याचवेळी वॉईन शॉपवर दगडफेकही करण्यात आली होती. या घटनेनंतर परिसरात तणावाची स्थिती होती. मार्केट पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली होती.
उपलब्ध माहितीनुसार पोलिसांनी बबलु (वय 30, रा. कसई खड्डा) याला अटक केली आहे. लूटमार केल्याच्या आरोपावरून ही कारवाई करण्यात आली आहे. शनिवारी त्याला न्यायायाधीशांसमोर हजर करण्यात आले. न्यायालयाच्या आदेशावरून त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे.