सातारा / प्रतिनिधी :
सातारा येथील बॉम्बे रेस्टॉरंट चौकात सेवा रस्त्यावर एका चारचाकीने धडक दिल्याने महिला वकील जखमी झाल्या. श्रध्दा गुजर असे जखमी महिला वकिलाचे नाव असून, याप्रकरणी श्रीपाद पवार याच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
दरम्यान, या अपघातानंतर श्रीपाद पवार हा जखमी श्रध्दा यांना वैद्यकीय उपचारासाठी रुग्णालयात न दाखल करता तेथून पळून गेला आहे. ही घटना ही घटना शुक्रवार, दि. 16 जुलै रोजी रात्री साडेनऊ वाजता घडली आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी की, श्रध्दा प्रभाकर गुजर (वय 26, रा. अहिरे कॉलनी, देगाव रोड, संभाजीनगर, सातारा) या त्यांची दुचाकी (एमएच 11 बीआर 3025) घेवून बॉम्बे रेस्टॉरंट चौकातील बालाजी हॉटेलसमोर थांबल्या होत्या. याचवेळी अजंठा चौक ते बॉम्बे रेस्टॉरंट चौक सेवा रस्त्याने श्रीपाद सुरेश पवार (वय 34, रा. सुरुर, ता. वाई, जि. सातारा) हे त्यांच्या ताब्यात असलेली वॅगनआर चारचाकी (एमएच 12 एनबी 2632) रस्त्यावर दुर्लक्ष करुन चालवत होते. यावेळी श्रीपाद याने श्रध्दा यांच्या दुचाकीला पाठीमागून जोराची धडक दिली. यात श्रध्दा यांच्या उजव्या पायाला आणि डाव्या पायाच्या नडगीला तसेच शरीराला मुका मार लागला. यात त्या जखमी झाल्या. या अपघातानंतर श्रीपाद पवार हा जखमी श्रध्दा यांना उपचारासाठी रुग्णालयात न दाखल करता तेथून पळून गेला. दि. 17 रोजी रात्री सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर श्रीपाद याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार कारळे करत आहेत.