कोल्हापूर / प्रतिनिधी
कागल मुरगुड रस्त्यावर व्हनाळी (ता कागल, जि कोल्हापूर) जवळील वाघजाई घाटात चालत्या कारचा स्फोट झाला. गाडी जळत जळत घाटात सुमारे दोनशे मीटर खोल दरीत जाऊन पडली. गाडी चालकाचा होरपळून मृत्यू झाला. घटनास्थळी कागल पोलीस दाखल झाले असून घटनास्थळी प्रचंड गर्दी झाली आहे. पेटत गेलेली गाडी दरीत पडल्यानंतर परिसरातील गवतालाही आग लागली. कागल नगरपरिषदेच्या अग्निशमन बंबाने आग विझवली.
शुक्रवारी सकाळी सहाच्या सुमारास ही घटना समजली. पोलिसांनी जळालेल्या गाडीचा शोध घेतला असता गाडी नंबर MH 09 AQ 3703 असून अभिजित धनवडे यांच्या मालकीची असल्याचे निदर्शनास आले. पोलिस गाडी मालकाचा शोध घेत आहे. दरम्यान गाडी घाटात गेल्यानंतर दोन स्फोट झाल्याचे प्रत्यक्षदर्शी लोकांनी सांगितले. या घटनेची माहीती कागल पोलिसांना मिळताच तात्काळ पोलीस आणि अग्निशमन घटनास्थळी पोहचले.