सावंतवाडीत नेट चिकन 120 वर : तो चिकन सेंटरचालक कमी दरावर ठाम : मागणी वाढली, पुरवठा कमी : तोडगा काढण्याचा प्रयत्न असफल
प्रतिनिधी / सावंतवाडी:
सावंतवाडीत बॉयलर चिकन रेट वॉर सुरू आहे. त्याचा फायदा ग्राहकांनी उठविला आहे. चिकन सेंटरवर चिकन हातोहात खपत असून उर्वरित ग्राहकांना अर्धा, पाऊण किलो चिकन देण्याची वेळ आली आहे. चिकन संपल्यानंतर आजुबाजूच्या गावात असलेल्या पोल्ट्री फार्ममधून चिकन आणून विकण्याची वेळ आली आहे. आजुबाजूच्या गावातील पोल्ट्री फार्ममधूनही बॉयलर कोंबडी मिळत नसल्याने शेवटी आजऱयावरून ती मागवावी लागली. परंतु मागणीप्रमाणे पुरवठा होत नसल्याने शेवटी चिकन सेंटर बंद करण्याची वेळ आली. स्पर्धेमुळे चिकनचे दर घसरविणे भाग पडले. याचा ग्राहकांचा फायदा झाला.
अलिकडेच मच्छीमार्केटनजीक बाजारपेठेत चिकन सेंटर उघडलेल्या एका चिकन सेंटरमालकाने दर 120 पर्यंत उतरविल्याने इतर चिकन सेंटरवाल्यांनाही दर उतरावे लागले. इतर चिकन सेंटर चालकांनी त्या चिकन सेंटरचालकाला समजावण्याचा
प्रयत्न केला. परंतु त्यावर तोडगा निघालेला नाही. मात्र, ही स्पर्धा चिकन सेंटर चालकांनाच नुकसान करणारी ठरत आहे. या चिकन रेट वॉरचे पडसाद आता जिल्हय़ातही पसरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. बॉयलर कोंबडी उत्पादनाचा खर्च आणि प्रत्यक्षातील विक्री यातील फरक कमी झाल्याने भविष्यात पोल्ट्री उत्पादकही अडचणीत येऊ शकतात. मत्र, या स्पर्धेत चिकनचा नेमका दर काय असावा, याबाबत ग्राहकांमध्ये जागृती झाली आहे.
अशी झाली स्पर्धा सुरू
सावंतवाडी बाजारपेठेत गेल्या महिन्यात चिकनचा दर गेल्या महिन्यात 240 होता. तर कोलगाव भागात असलेल्या चिकन सेंटरवर हाच दर 220 होता. त्याची स्वत:ची पोल्ट्री असल्याने तो 20 रुपये कमी दराने चिकन विकत होता. गेले काही दिवस तो तेथे व्यवसाय करत होता. मात्र, 15 दिवसांपूर्वी त्याने बाजारपेठेतही चिकन सेंटर घातले. येथेही तो बाजारपेठेतील अन्य चिकन सेंटरपेक्षा 20 रुपये कमी दराने चिकन विकू लागला. इथूनच चिकन रेट वॉर सुरू झाले आणि नेट चिकनचा दर 200, 180, 160 आणि आता शेवटच्या पायरीवर 120 वर येऊन स्थिरावला. त्याने दर उतरविला की इतरांनाही तो उतरावा लागतो.
चिकनचा तुटवडा
त्या चिकन सेंटरचालकाला अन्य सेंटर चालकांनी समजावण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यावर तोडगा निघाला नाही. मात्र, यामुळे आता बाजारात चिकनची टंचाई निर्माण झाली आहे. चिकन मिळेनासे झाले आहे. हॉटेलमधून पूर्वीपेक्षा मागणी वाढल्याने चिकन हातोहात खपत आहे. ग्राहकांनाही चिकन मिळेनासे झाले आहे. त्यामुळे आजुबाजूच्या पोल्ट्रीमधून बॉयलर कोंबडय़ा आणून चिकन विकले जात आहे. परंतु बॉयलर कोंबडय़ाही मिळणे मुश्किल झाल्याने कुणाला अर्धा, कुणाला पाऊण असे भागवून चिकन दिले जात आहे. दर उतरल्याने ग्राहकांकडून मागणी वाढली आहे. परंतु बॉयलर कोंबडय़ा नसल्याने चिकन सेंटर बंद करण्याची वेळ आली आहे. स्पर्धेमुळे चिकनचे दर उतरल्याने ते ग्राहकांच्या पथ्यावर पडले आहे. चिकन सेंटरचालक नुकसानीत सापडले आहेत.
आता दर ठरतात स्पर्धेतून दरम्यान, बाजारपेठेत घाऊक बॉयलर कोंबडय़ांचा पुरवठा एका पोल्ट्री डिलरकडून करण्यात येत होता. त्याच्यामार्फत चिकन विक्री दर ठरत होते. परंतु नव्याने आलेल्या पोल्ट्री मालक कम चिकन सेंटर चालकामुळे याला छेद बसला आहे. त्यातून ही स्पर्धा होऊन दर कोसळले. तर या चिकन सेंटर चालकाने आपण 180 दराने चिकन विकले होते. त्यावेळी ग्राहकाने हे चिकन जादा दराचे असल्याचे सांगत परत आणून दिले. असे कधी घडले नव्हते. दर पटल्यानंतर ग्राहक चिकन खरेदी करतो. परंतु असे प्रथमच घडले. कुणीतरी फितवल्यानेच असे घडले. त्यामुळे मला दर कमी करावे लागले, असे स्पष्ट केले.