चिकोडीत 2, हिरेकुडी येथे 1 तर नणदीवाडीत 2 कोरोनाग्रस्त, प्रशासनाची धावाधाव
वार्ताहर/ चिकोडी
चिकोडी शैक्षणिक जिल्हय़ातील चिकोडी वगळता इतर सर्व तालुक्यात एकही रुग्ण सापडला नव्हता असे असताना रविवारी सायंकाळी तब्बल 5 कोरोना रुग्ण आढळून आल्याने संपूर्ण चिकोडी तालुकाच हादरला आहे. विशेष म्हणजे इन्स्टिटय़ुशनल क्वारंटाईनचा अवधी संपल्याने होम क्वारंटाईन करण्यात आलेल्यापैकी तालुक्यातील तब्बल पाच जणांचा रविवारी सायंकाळी रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने चिकोडी शहरासह ग्रामीण भागही हादरला आहे.
चिकोडी शहरातील झारी गल्ली येथील एका 21 वर्षीय महिलेसह तिच्या 1 वर्षीय बालकाचाही पॉझिटिव्ह रिपोर्ट आला आहे. सदर महिला महाराष्ट्रातील उस्मानाबाद येथून आली होती. त्या दोघांना प्रथमत: इन्स्टिटय़ुशनल क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले होते. 7 दिवसाचा अवधी झाल्यानंतर त्यांना होम क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले होते. या दोन्ही रुग्णांचा स्वॅब 24 मे रोजी तपासणीसाठी घेण्यात आला होता. तपासणीनंतर त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला.
चिकोडी तालुक्यातील हिरेकुडी येथील 25 वर्षीय महिला महाराष्ट्रातील ठाणे येथे नोकरीनिमित्त होती. तिला देखील तेथून आल्यानंतर इन्स्टिटय़ुशनल क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले. त्यानंतर 7 दिवसाचा अवधी सपंल्याने सोडण्यात आले होते. सदर महिलेचा स्वॅबही 24 मे रोजी घेण्यात आला होता. तिचाही रिपोर्ट पॉझिटिव्ह आला.
चिकोडी तालुक्यातील नणदीवाडी येथील 23 व 24 वर्षीय दोन युवकांचा रिपोर्टही पॉझिटिव्ह आला आहे. हे दोघे युवक दिल्लीहून आले होते. त्यांचाही 7 दिवसांचा इन्स्टिटय़ुशनल क्वारंटाईनचा अवधी संपल्यानंतर त्यांनाही होम क्वारंटाईन करण्यात आले होते. आता या दोघांनाही कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल आला आहे.
प्रशासन सतर्क
राज्य आरोग्य खात्याद्वारे रविवारी सायंकाळी 6 वाजता हेल्थ बुलेटिन जाहीर होताच चिकोडीचे डीएसपी मनोजकुमार नाईक, सीपीआय आर. आर. पाटील, तालुका वैद्याधिकारी डॉ. व्ही. व्ही. शिंदे, तहसीलदार संतोष संपगावी, पीएसआय राकेश बगली आदींनी या सर्व रुग्णांच्या घरी धाव घेऊन सर्वांना पीपी किटसह आरोग्य खात्याच्या विशेष वाहनाद्वारे बेळगावच्या सिव्हिल इस्पितळात पाठवून देण्यात आले.
नणदीवाडीतील रुग्णांचा नकार
दरम्यान नणदीवाडी येथील ज्या दोन युवकांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. ते दोघे जाण्यासाठी हुज्जत घालत होते. पण या सर्व अधिकाऱयांनी त्यांना समज देऊन बेळगावला पाठविले.
धोका वाढला
आधी इन्स्टिटय़ुशनल क्वारंटाईनचा 14 दिवसाचा असणारा कालावधी प्रशासनाने 7 दिवस केला. 7 दिवसाचा कालावधी संपताच सदर रुग्णांना सोडण्याचा जो आदेश केला त्याद्वारे त्यांना त्यांचा अहवाल येण्याआधीच होम क्वारंटाईन करण्यात आले, पण सोडल्यानंतर 2-3 दिवसांनी त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. परिणामी हे कोणाच्या संपर्कात आले याची चौकशी यापुढे होणार असल्याने चिकोडी तालुक्यास आता यापुढे मात्र धोका वाढला आहे.
तालुका प्रशासनाच्या भूमिकेकडे लक्ष
चिकोडी शहरातील झारी गल्ली व नणदीवाडी आणि नागराळ येथे कोरोनाचे रुग्ण सापडल्याने या ठिकाणी सीलडाऊन करण्यासाठी तालुका प्रशासन, नगरपरिषद व ग्राम पंचायतीतील अधिकाऱयांची रात्री बैठक होत असून याविषयी कडक भूमिका घेण्याची शक्यता आहे.