दोन्ही देशांमधील तणावाचा हॉलिवूडला फटका, मोठय़ा स्टुडियोजनी रोखले चित्रपटांचे प्रदर्शन
अमेरिका-चीन यांच्यातील तणाव आणि कोरोना महामारीने जगातील सर्वात मोठी चित्रपटसृष्टी असलेल्या हॉलिवूडचे प्रभुत्व धोक्यात आणले आहे. 2020 मध्ये चीनच्या बॉक्स ऑफिसने 22.5 हजार कोटींचा गल्ला जमविला, हा आकडा अमेरिकन बॉक्स ऑफिसच्या कमाईपेक्षा सुमारे 7,400 कोटी रुपयांनी अधिक आहे. दुसरीकडे चीनच्या बाजारपेठेत हॉलिवूडपट अत्यंत फ्लॉप ठरत आहेत. वंडर वुमन 1984 आणि चिनी प्रेक्षकांना डोळय़ासमोर ठेवून तयार करण्यात आलेला डिस्नेचा ‘मुलान’ चित्रपटही यात सामील आहे. या स्थितीमुळे हॉलिवूडला अब्जावधीचा तोटा झाला आहे.
कोरोना आणि चिनी प्रेक्षकांचा अघोषित बहिष्कार पाहता हॉलिवूडच्या आघाडीच्या स्टुडियोजनी सध्या कित्येक चित्रपटांचे प्रदर्शन लांबणीवर टाकले आहे. 2 एप्रिल रोजी प्रदर्शित होणारा जेम्स बाँडचा चित्रपट ‘नो टाइम टु डाय’ आता ऑक्टोबरमध्ये येणार आहे. 100 हून अधिक चित्रपटांची निर्मितीही थांबली आहे.
हॉलिवूडच्या बॉक्स ऑफिसचा 70 टक्के महसूल विदेशातून येतो. यातही चिनी बाजाराचा हिस्सा 50 टक्के आहे. उदाहरणार्थ हॉलिवूड ब्लॉकबस्टर एव्हेंजर्स ः एंडगेम चित्रपटाने चीनमध्ये 32 हजार कोटी रुपयांची कमाई केली होती. टाळेबंदीनंतर चीनने चित्रपटगृहे सुरू केली आणि हॉलिवूडने केवळ याच बाजाराच्या भरवशावर चित्रपट प्रदर्शित केल्याने निर्माते तोंडावर आपटले आहेत.
भारतावर लक्ष द्यावे
चिनी प्रेक्षकांनी हॉलिवूडकडे पाठ फिरविण्यासाठी अनेक कारणे आहेत. यात कोरोनासाठी चीनला अमेरिकेने जबाबदार ठरविणे आणि दोन्ही देशांदरम्यान सुरू असलेल्या भूराजकीय तणावानेही चिनी नागरिकांमध्ये राष्ट्रवादाला बळ दिले आहे. अशा स्थितीत हॉलिवूडला आता भारतासारख्या मोठय़ा बाजारात विस्तार करावा लागणार आहे. भारतात बॉक्स ऑफिसचे वार्षिक कलेक्शन 3.2 लाख कोटी रुपये आहे.