चिनी डॉक्टरकडूनच खुलासा
चीन स्वतःच्या कोरोना लसीचा गाजावाजा करत असला तरीही एका चिनी डॉक्टरनेच त्याचा भांडाफोड केला आहे. चीनमध्ये निर्मित सायनोफार्मची लस जगात सर्वात असुरक्षित असून यामुळे 73 पेक्षा अधिक दुष्परिणाम होण्याची भीती असल्याचे चीनमधील डॉक्टर ताओ लिना यांनी म्हटले आहे. चीनने लसीच्या चाचण्या पूर्ण केलेल्या नाहीत आणि याचे अनेक धोकादायक दुष्परिणाम आहेत, असे ताओ यांनी सांगितले आहे. परंतु चिनी प्रशासनाच्या दबावामुळे त्यांनी काही वेळाने घुमजाव केले आहे.
नववर्षाच्या पूर्वसंध्येला चीनच्या आरोग्य अधिकाऱयांनी सायनोफार्मच्या लसीला सशर्त मंजुरी दिली होती. ही लस 79.34 टक्के उपयुक्त असल्याचा चीनचा दावा आहे. कोटय़वधी लोकांना ही लस फेब्रुवारीमध्ये दिली जाणार आहे.
डॉक्टर ताओ यांनी सायनोफार्मच्या लसीसंबंधी एक ब्लॉग लिहून ही लस जगात सर्वात असुरक्षित असल्याचे नमूद केले होते. हा ब्लॉग चिनी समाजमाध्यम वीबोवर प्रसारित करण्यात आला होता. हा ब्लॉग आता हटविण्यात आला असून त्याचे कारणही देण्यात आलेले नाही. सायनोफार्मची लस टोचलेल्या ठिकाणी वेदना, डोकेदुखी, उच्च रक्तदाब, दृष्टीवर परिणाम, चव जाणे आणि लघुशंकेवेळी त्रास होणे इत्यादी दुष्परिणाम दिसून येत असल्याचे ताओ यांनी म्हटले होते.