माहिती घेण्यासाठी कार्यकर्त्यांची फौज लागली कामाला, माझे कुटुंब, माझी जबाबदारी योजनेला सैनिक करणार मदत
प्रतिनिधी/ चिपळूण
कोरोनाच्या काळात उपचार करून आर्थिक लूट करणारे डॉक्टर शिवसेनेच्या रडावर आले आहेत. अशी लूट कोणकोण करीत आहे याची माहिती घेण्यासाठी कार्यकर्त्यांची फौज कामाला लागली आहे. तसेच माझे कुटुंब, माझी जबाबदारी ही योजना यशस्वी करण्यासाठी शिवसैनिक प्रशासनाला मदत करणार असल्याची माहिती माजी आमदार सदानंद चव्हाण, तालुकाप्रमुख प्रताप शिंदे यांनी रविवारी येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
ते म्हणाले की, कोरोनामुळे जनता आर्थिक संकटाचाही सामना करीत आहे. असे असताना उपचाराच्या नावाखाली काही डॉक्टर आर्थिक लूट करीत असल्याच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत. त्यामुळे ज्यांची अशी लूट झाली आहे त्यांनी शिवसैनिकांशी संपर्क साधावा. तसेच आमचे कार्यकर्तेही याची माहिती घेत आहेत. त्यामुळे पुरावे हाती आल्यानंतर आम्ही त्यांची प्रशासनाकडे लेखी तक्रार करणार आहोत. तरीही कारवाई न झाल्यास शिवसेना स्टाईलने न्याय मिळवून दिला जाणार असल्याचे प्रताप शिंदे यांनी सांगितले.
तसेच शासनाने सुरू केलेल्या माझे कुंटुब, माझी जबाबदारी ही योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी गावागावातील शिवसैनिक प्रशासनाला सहकार्य करणार आहे. शेवटच्या घटकांपर्यंत पोचून त्यांना कोरोनाची भीती न बाळगण्याचे आवाहन आम्ही करणार आहोत. काळजी करण्यापेक्षा खबरदारी घ्या असे आवाहनही चव्हाण यांनी केले आहे. यावेळी तालुकाप्रमुख संदीप सावंत, दिलीप चव्हाण आदी उपस्थित होते.