प्रतिनिधी/ चिपळूण
शहरातील पाग-गोपाळकृष्णवाडी येथील घराला शुक्रवारी सकाळी 11 वाजता भीषण आग लागली. यावेळी एका सिलिंडरचाही स्फोट झाल्याने परिसर हादरला, दोन सिलिंडर बाहेर काढण्यात यश आले. यात मंडप साहित्यासह अन्य वस्तू खाक झाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. नगर परिषदेच्या अग्निग्नशमन दलाने तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली. 10 दिवसातील आगीची ही दुसरी घटना असल्याने नागरिकांची चिंता वाढली आहे.
मुंबईत राहणाऱया अरुण भालेकर यांच्या भीमाशेठ निवासस्थानी त्यांचे नातेवाईक वसंत भोजने, पांडुरंग भोजने, शशिकांत भोजने, नीलेश भोजने व विजय भोजने असे नातेवाईक 4 वर्षांपासून राहतात. शुक्रवारी सकाळी घरात लक्ष्मी भोजने एकटय़ाच असताना शॉर्टसर्किटने घराला आग लागली. हा प्रकार लक्षात येताच शेजाऱयांनी धाव घेत लक्ष्मी यांना घराबाहेर काढले. त्यानंतर काही वेळातच आगीने रौद्ररूप धारण केले आणि एका खोलीतील सिलिंडरचा स्फोट झाला.
माहिती मिळताच नगर परिषदेच्या अग्निग्नशमन दलाने आग नियंत्रणात आणली. या घटनेत नीलेश भोजने यांचे मंडपाचे साहित्य, घरातील कपडे व अन्य साहित्य खाक झाले. या आगीत भोजने कुटुंबियांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. काही दिवसांपूर्वी शहरातील काविळतळी परिसरातील ऑर्चिड इमारतीमधील शेवटच्या मजल्यावरील सदनिकेला रात्री अचानक भीषण आग लागली होती. यावेळी नागरिक व नगर परिषद कर्मचाऱयांनी जीव धोक्यात घालून 2 सिलिंडरपर्यंत आग पोचू न दिल्याने मोठा अनर्थ टळला. सदनिकेत अडकलेल्या अनप कुटुंबातील पती, पत्नी व 12 वर्षाचा मुलाला सुखरूप बाहेर काढण्यात आले होते. आगीच्या घटना घडत असल्याने नागरिकांची चिंता वाढली आहे.