स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई -एकास अटक
चिपळूण
अंमली पदार्थांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी धडक मोहीम हाती घेतली आहे. त्यानुसार तालुक्यातील सावर्डे येथील अडरेकर मोहल्ल्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने रविवारी पहाटे 5.30 वाजता छापा टाकून 90 हजार 500 रूपये किंमतीचा 4.525 किलो वजनाचा गांजा पकडल्याची घटना रविवारी घडली. या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे.
गुलाम महामुद काद्री (सावर्डे-अडरेकर मोहल्ला) असे अटक केलेल्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सावर्डेतील अडरेकर मोहल्ल्यात एकजण गांजा विक्रीचा व्यवसाय करीत असल्याची गोपनीय माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱयांना मिळाली होती. त्यानुसार रत्नागिरी गृह पोलीस उपअधीक्षक यांच्यासह स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक सावर्डेत दाखल झाले. या पथकाने रविवारी पहाटे 5.30 च्या सुमारास अडरेकर मोहल्ल्यात काद्री रहात असलेल्या घरावर छापा टाकला. यावेळी काद्री याच्याकडून 90 हजार 500 रुपये किंमतीचा 4.525 किलो गांजा पोलिसांनी जप्त केला.
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक मोहितकुमार गर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी गृह पोलीस उपअधीक्षक एस. एल. पाटील, पोलीस निरीक्षक हेमंतकुमार शहा, फॉरेन्सिक युनिटचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पोटफोडे, स्थानिक गृन्हे अन्वेषण शाखेचे संजय कांबळे, संदीप कोळंबेकर, शांताराम झोरे, प्रशांत बोरकर, सुभाष भागणे, राजेश भुजबळराव, आशिष शेलार, पोलीस नाईक विजय आंबेकर, बाळू पालकर, उत्तम सासवे, अमोल भोलसे, सत्यजित दरेकर, भास्कर धोंडगा, अमोल कांबळे, कोमल कदम, सांची सावंत, अक्षय कांबळे, श्रीकांत दाभाडे, श्वान हस्तक सुरज भोळे, नागनाथ पाचवे, संभाजी घुगरे यांच्या पथकाने केली.