ऑनलाईन टीम / बीजिंग :
चीनच्या राजधानीत रविवारी पुन्हा कोरोनाची 57 नवीन प्रकरणे समोर आली आहेत. दक्षिण बीजिंगमधील मांस व भाजी मार्केटमधील लोकांमध्ये हा विषाणू आढळून आला आहे.
राष्ट्रीय आरोग्य आयोगाने म्हटले आहे की, राजधानीत घरगुती संसर्गामुळे 36 लोक प्रभावित झाले आहेत. रविवारी नोंदवलेल्या घटनांपैकी दोन प्रकरणे ईशान्य लेओनिंग प्रांतातील आहेत. एकदा कोरोनाचे नवे प्रकरण समोर आल्यानंतर पुन्हा एकदा लॉकडाऊनची परिस्थिती निर्माण झाली आहे. बाजारालगत असलेल्या 11 निवासी भागात राहणाऱ्या लोकांना घरात राहण्याची सूचना देण्यात आली आहे.
बाजार परिसरात शेकडो पोलीस अधिकारी आणि निमलष्करी दले तैनात करण्यात आली आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून इतर शहरांमध्येही अन्न बाजार बंद ठेवण्यात आला आहे. बीजिंग मार्केट अथॉरिटीने मांस, पोल्ट्री, कोठार, केटरिंग सर्व्हिसेस आणि मासे विक्रीशी संबंधित दुकानांच्या सुरक्षा तपासणीचे आदेश दिले आहेत. परिसराजवळील 9 शाळा बंद करण्यात आल्या आहेत. सर्व प्रकारच्या कार्यक्रमांनाही बंदी घातली आहे.