चीनमध्ये 4500 कोंबडय़ांचा मृत्यू
ऑनलाईन टीम / हुनान :
कोरोना या जीवघेण्या विषाणूने थैमान घातलेल्या चीनमध्ये आता बर्ड फ्लूचाही धोका निर्माण झाला आहे. चीनच्या हुनान प्रांतातील शुआंगक्विन जिह्यातील एका पोल्ट्री फार्ममध्ये 4500 कोबंडय़ांचा मृत्यू झाला आहे.
चीनमध्ये कोरोनाची भिती असताना आता प्राणिमात्रांचेही जीव धोक्यात आले आहेत. चीनमध्ये 4500 कोंबडय़ांचा मृत्यू झाल्याने बर्ड फ्लूची भीती भेडसावत आहे. कोंबडय़ांचा मृत्यू झाला असला तरी अद्याप कोणाही व्यक्तीमध्ये ‘एच 5 एन 1’ हे व्हायरस आढळले नाहीत. कोरोना व्हायरसचा सामना करीत असताना बर्ड फ्लू चे संकट आल्याने स्थानिक प्रशासनाने आतापर्यंत 17 हजार 828 कोंबडय़ांना मारले आहे. चीनच्या कृषी मंत्रालयाने याबाबतची माहिती दिली आहे.
कोरोना विषाणूमध्ये चीनमध्ये आतापर्यंत 361 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 14 हजार 562 जणांना याची लागण झाली आहे. या विषाणूनची भीती आता जगभर पसरली असून, चीनमधून मायदेशी परतलेल्या इतर देशातही कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत.