ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
दिल्लीतील जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठाच्या गेटवर पुन्हा एकदा अज्ञातानांनी गोळीबार केला आहे. रविवारी रात्री उशिरा विद्यापीठाच्या गेट क्रमांक 5 जवळ ही घटना घडली. मागील चार दिवसातील गोळीबाराची ही तिसरी घटना आहे.
याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरूद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 307 आणि शस्त्रास्त्र कायद्याच्या कलम 27 अंतर्गत एफआयआर दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री उशिरा दोन अज्ञातांनी जामिया विद्यापीठाच्या गेट क्रमांक 5 जवळ गोळीबार केला. त्यानंतर ते पसार झाले. हे हल्लेखोर लाल रंगाच्या स्कूटरवरुन आले होते. या गोळीबारात कोणीही जखमी अथवा कोणतीही जिवीतहानी झाली नाही.
नागरिकत्व सुधारणा कायदा आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणी विरोधात जामिया मिलिया इस्लामिया विद्यापाठीत गेल्या अनेक दिवसांपासून निदर्शने सुरू आहेत. मागील चार दिवसात गोळीबार झाल्याची ही तिसरी घटना आहे. गुरुवारी रामभक्त गोपाल या एका व्यक्तीने आंदोलकांवर गोळीबार केला होता. तर शनिवारी शाहीन बाग परिसरात कपिल गुर्जर नावाच्या व्यक्तीने आंदोलन स्थळापासून काही अंतरावर हवेत गोळीबार केला होता. काल मध्यरात्री पुन्हा एकदा अज्ञातांनी विद्यापीठाच्या गेटवर गोळीबार केला आहे.