बीजिंग
चीन सरकारने चांगचुन शहरात कोरोना रुग्णसंख्या वाढीमुळे लॉकडाऊनची अंमलबजावणी केली असल्याचे सांगितले जाते. लॉकडाऊन काळात कडक नियम जारी केले असल्याचे समजते. मोठय़ा लोकसंख्येच्या चांगचुन शहरात कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ झाल्याची बाब समोर आली आहे. शासनाने याची दखल घेत नव्याने निर्बंध लादले आहेत. लोकांनी खबरदारी म्हणून घरीच राहावे, असे शासनाने आवाहन केले आहे. शहरातील वाहतूक व्यवस्था बंद करण्यात आली असून कुटुंबातील एकाच सदस्याला जरुरीचे सामान आणण्याची परवानगी असणार असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे. वस्तु आणण्यासाठी दोन दिवसांतून एकदा जावे लागणार आहे. 397 कोरोना रुग्ण चीनमध्ये आढळून आले असून 98 हे चांगचुनच्या जिलीन प्रांतातले असल्याचे स्पष्ट झाले आहे. मागच्या आठवडय़ापासून आतापर्यंत या शहरातील कोरोना रुग्णांची संख्या 1100 वर पोहचली आहे. म्हणूनच खबरदारी म्हणून प्रशासनाने लॉकडाऊन लागू केला आहे.