जगापासून याचे रहस्य लपविण्याचा चीनचा प्रयत्न
चीनने अनेक गोष्टी लपविल्या असून त्या जगासमोर येऊ न देण्याचा त्याचा आटोकाट प्रयत्न असतो. चीनमध्ये असाच एक रहस्यमय पिरॅमिड असून त्याबद्दल जगाला कुठलीच माहिती नाही. या रहस्यमय पिरॅमिडची सुरक्षा चिनी सैन्य करते. या पिरॅमिडमध्ये चीनच्या इतिहासाशी संबंधित अनेक रहस्य दडलेली असू शकतात, याचमुळे चीनने हा पिरॅमिड जगापासून लपवून ठेवल्याचे मानले जाते.
1 हजार फूट उंचीचा पिरॅमिड
हा पिरॅमिड चीनच्या शियान शहरापासून सुमारे 100 किलोमीटर अंतरावर जंगलात स्थित आहे. पिरॅमिडच्या आकारातील या वास्तूच्या रहस्याची उकल आजवर झालेली नाही. पिरॅमिडच्या रहस्यांना चीनने शतकांपासून लपवून ठेवले ाहे. 1912 मध्ये एक अमेरिकन व्यापारी प्रेड मेयर श्रोडर तेथे पोहोचला होता. त्यानंतर जगाला या पिरॅमिडविषयी माहिती कळली होती. अमेरिकेच्या व्यापाऱयाने स्वतःच्या डायरीत याचा खुलासा केला होता. या जंगलामध्ये 1 हजार फूट उंच आणि त्याहून अधिक लांबीचा पिरॅमिड असल्याचे त्यांनी नमूद केले होते. त्यानंतर अमेरिकेच्या वायुदलाचे वैमानिक जेम्स गॉजमन यांनी हा पिरॅमिड पाहिला होता. हा इजिप्तच्या ग्रेट पिरॅमिडपेक्षाही उंच असून त्याच्यावर क्रिस्टलप्रमाणे रत्न बसविण्यात आले असल्याचे गॉजमन यांनी सांगितले होते.
चिनी सैन्याकडून सुरक्षा
जर्मन शोधकार हार्टविग हॉसडॉर्फ यांनी 90 च्या दशकादरम्यान या पिरॅमिड्सचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना यश मिळू शकले नाही. चिनी सैन्य पिरॅमिड्ची सुरक्षा करत असल्याची माहिती त्यांना मिळाली. या 8 हजार वर्षे जुन्या पिरॅमिडवर वृक्ष आणि गवत बहरले असल्याचे सांगण्यात आले. दूर अंतरावरून पाहिल्यास हे पिरॅमिड पर्वताप्रमाणे भासतात. या पिरॅमिडमध्ये राजघराण्याशी संबंधित लोकांना दफन करण्यात आल्याचे मानले जाते.
रहस्याची उकल का नाही?
पाश्चिमात्य देशांच्या पुरातत्वतज्ञांनी काही छायाचित्रांचा अभ्यास केल्यावर पिरॅमिडवर मुद्दामहून झुडूपं वाढू देत रहस्य जगापासून लपविण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा दावा केला आहे. तेथे मौल्यवान वस्तू लपविण्यात आल्याचे काही तज्ञांचे मानणे आहे.