इनर मंगोलियाच्या एजिनमध्ये लॉकडाउन -35 हजार लोक घरात कैद
वृत्तसंस्था/ बीजिंग
चीनच्या अनेक हिस्स्यांमध्ये कोरोना विषाणूच्या डेल्टा व्हेरियंटचे संक्रमण सातत्याने वाढत चालले आहे. चीनच्या उत्तर-पश्चिममधील इनर मंगोलियाच्या एजिन काउंटीच्या लोकांना सोमवारपासून घरात राहण्यास सांगण्यात आले आहे. एजिनची लोकसंख्या 37,500 इतकी आहे. लोकांना कोरोना विषयक दिशानिर्देशांचे पालन करण्याचा निर्देश देण्यात आला आहे. एजिन हा सध्या कोरोनाचा हॉटस्पॉट ठरले आहे. तेथे मागील आठवडय़ात 150 हून अधिक नवे बाधित सापडले.
सुमारे एक आठवडय़ात कोरोना संक्रमण 11 प्रांतांमध्ये फैलावले आहे. अशा स्थितीत आगामी काळात स्थिती अधिकच बिघडत जाणार असल्याचा इशारा चीनच्या नॅशनल हेल्थ कमिशनने दिला आहे. या इशाऱयानंतर एजिनमध्ये लॉकडाउनची घोषणा करण्यात आली. चीनमध्ये सोमवारी 38 नवे रुग्ण सापडले असून यातील निम्मे इनर मंगोलियातील आहेत.
बीजिंगमध्येही शिरकाव
राजधानी बीजिंगमध्ये 12 नवे कोरोनाबाधित आढळून आले आहेत. कोरोना संक्रमण असलेल्या भागांमधून बीजिंगमध्ये येण्यासाठी लोकांना काही अटींचे पालन करावे लागत आहे. कोरोना चाचणी अहवाल दाखविल्यावरच लोकांना राजधानीत प्रवेश देण्यात येतोय. तसेच या लोकांच्या आरोग्यावर 2 आठवडय़ांपर्यंत देखरेख ठेवण्यात येणार आहे. वाढते संक्रमण पाहता अधिकाऱयांनी बीजिंगमधील चाचण्या वाढविणे आणि हॉटेलमधील बुकिंग रोखण्यासारखी पावले उचलली आहेत.
अनेक भागांमध्ये संक्रमण
बीजिंग समवेत इनर मंगोलिया, गांसु, निंग्जिया आणि गुइझोउमध्ये कोरोना संक्रमण वाढत आहे. या प्रांतांमध्ये देशाच्या अन्य भागांमधून प्रवास करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. तसेच रेल्वेवाहतुकीवरही निर्बंध घालण्यात आले आहेत. वाढते संक्रमण पाहता प्रशासन अत्यंत दक्ष आहे.
वृद्ध दांपत्य जबाबदार
संक्रमण वाढण्यामागे शांघायमधील एक वृद्ध दांपत्य जबाबदार असल्याचे सांगण्यात येतेय. हे दांपत्य शियान समवेत अनेक शहरांमध्ये पोहोचले होते. या शहरांमध्ये कोरोनाचे बाधित आढळून आले आहेत. हा प्रकार उघडकीस आल्यावर या दांपत्याच्या संपर्कात आलेल्या लोकांचा शोध घेतला जातोय. तीन दिवसांमध्ये त्यांच्या थेट संपर्कात आलेल्या शेकडो लोकांचा थांगपत्ता लावण्यात आला आहे.