निफ्टी बँक निर्देशांकाची झेप, आयसीआयसीआय बँक सर्वाधिक नफ्यात
वृत्तसंस्था/ मुंबई
भारतीय शेअर बाजार आठवडय़ाच्या पहिल्या दिवशी सोमवारी तेजीसह बंद होण्यात यशस्वी झाला असून गेल्या 4 दिवसाच्या घसरणीला अखेर विराम मिळाला. बँकिंग आणि वित्त कंपन्यांच्या समभागामुळे बाजाराला आधार मिळाला.
सोमवारी सरतेशेवटी बीएसई सेन्सेक्स निर्देशांक 145 अंकांच्या वाढीसह 60,967.05 अंकांवर तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांक 10 अंकांच्या वाढीसह 18,125.40 अंकांवर बंद झाला. गेली चार सत्रे बाजारात असणारी घसरण सोमवारी अखेर रोखली गेली. सोमवारी दिवसभरात मोठा चढ-उतार दिसून आला. आठवडय़ाच्या पहिल्या दिवशी बाजारात मजबुतीचाच माहोल होता. बँकिंग आणि वित्तसेवा कंपन्यांच्या समभागांनी बाजाराला चांगला आधार देण्याचे काम केले. पण सकाळीच एनएसईवर रियल्टी निर्देशांक 5 टक्क्यांनी घसरलेला दिसला. आयटी आणि फार्मा समभागांची जोरदार विक्री झाली.
आयसीआयसीआय बँकेच्या समभागात उसळी
बाजारात आयसीआयसीआय बँकेचे समभाग 11 टक्के इतके उसळी घेताना दिसले. ऍक्सिस बँक, ओएनजीसी, टेक महिंद्रा आणि जेएसडब्ल्यू स्टील यांचे समभागही वधारलेले होते. दुसरीकडे बीपीसीएल, बजाज फिनसर्व्ह, एसबीआय लाइफ, बजाज ऑटो आणि टाटा मोटर्स यांच्या समभागाच्या भावात 2.5 ते 3.3 टक्के इतकी घसरण दिसून आली. शुक्रवारी शेअर बाजार सलग चौथ्या सत्रात घसरण नोंदवत 60,821 अंकांवर बंद झाला होता.
निफ्टीत 13 समभाग तेजीसह बंद झाले होते. तर सेन्सेक्समधील 7 समभाग तेजीसह बंद झाले होते. आशियाई बाजारांचा विचार करता मिळता-जुळता कल दिसून आला. जपानचा निक्केई 0.65 टक्के घसरला तर हाँगकाँगचा हँगसेंग 0.1 टक्के इतका कमकुवत होता. चीनचा शांघाई कम्पोझीट मात्र 0.75 टक्के वाढून बंद झाला. कोरीयाचा कोस्पीही अर्धा टक्के वाढत बंद होण्यात यशस्वी झाला. सुरूवातीला शेअर बाजारात अचानक तेजीचा सूर दिसला होता. रिलायन्स इंडस्ट्रिज आणि आयसीआयसीआय बँक यांच्या दुसऱया तिमाहीतील मजबूत नफ्याच्या कामगिरीमुळे बाजार सुरूवातीला तेजीत होता. पण नंतर ही तेजी मात्र राखता आली नाही. दरम्यान बँक निफ्टी निर्देशांकाने मात्र सोमवारी 41 हजाराची सर्वकालीक उच्चांकी झेप घेण्याचा विक्रम केला.