प्रतिनिधी/ बेळगाव
उद्यमबाग येथील चेंबर ऑफ कॉमर्सच्या सभागृहात बेळगावचे प्रसिद्ध उद्योजक कै. रावसाहेब गोगटे यांच्या प्रतिमेचे अनावरण सोमवारी करण्यात आले. रावसाहेब गोगटे सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. रोटरीचे माजी प्रांतपाल अविनाश पोतदार, तरुण भारत ट्रस्टचे सचिव जगदीश कुंटे यांच्या हस्ते प्रतिमेचे अनावरण करण्यात आले.
यावेळी बोलताना जगदीश कुंटे म्हणाले, रावसाहेब फक्त उद्योजक नव्हते तर समाजाविषयीची कळकळ त्यांच्या मनामध्ये होती. बेळगावच्या शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रात त्यांचे भरीव योगदान आहे. त्यांनी अनेक संस्था उभ्या केल्या आहेत. त्यामुळे खरे बेळगावभूषण रावसाहेब गोगटे असल्याचे त्यांनी सांगितले.
किरण ठाकुर यांनी दिल्या शुभेच्छा
रावसाहेबांचा जनसंपर्क फार मोठा होता. यशवंतराव चव्हाण, शंकरराव चव्हाण, निलकंठ कल्याणी असा त्यांचा मोठा मित्रपरिवार होता. त्यांचे बोलणे गोड आणि समोरच्याला दिलासा देणारे होते. देश-विदेशात त्यांचा संचार असायचा. कोकणचा कॅलिफोर्निया करता येईल, ही त्यांचीच संकल्पना असल्याचे तरुण भारतचे समूहप्रमुख व सल्लागार संपादक किरण ठाकुर यांनी सांगून गोगटे कुटुंबीयांना फोनवरून शुभेच्छा दिल्या.
अविनाश पोतदार म्हणाले, महाराष्ट्र-कर्नाटकात रावसाहेबांनी उद्योगातून वेगळी छाप उमटविली. त्यांच्याकडून आम्हाला आजही प्रेरणा मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. चेंबर ऑफ कॉमर्सचे माजी अध्यक्ष गोविंद फडके, चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष श्रीधर उप्पीन यांनी मनोगते व्यक्त केली. रावसाहेबांचे चिरंजीव शिरीष गोगटे यांनी सर्वांचे स्वागत केले. चेंबरने रावसाहेबांच्या नावाने पुरस्कार देण्याची सूचना गोगटे यांनी केली.