क्रीडा प्रतिनिधी /मडगाव
सिको क्लबचा 5 विकेट्सनी पराभव करून एमआरएफ स्पोर्ट्स क्लबने गोवा क्रिकेट संघटनेने आयोजित केलेल्या ‘ब’ विभाग लीग क्रिकेट स्पर्धेत विजय साकारला. काल हा सामना सांगे क्रिकेट अकादमीच्या मैदानावर खेळविण्यात आला. एमआरएफच्या विजयात चेतन म्हार्दोळकरने मोलाचा वाटा उचलताना अष्टपैलू कामगिरी केली.
प्रथम फलंदाजी करताना सिको क्लबने आपल्या डावात 33.1 षटकात सर्वबाद 135 धावा केल्या. त्यांच्या निसर्ग नागवेकरने 78 चेंडूत 6 चौकारांनी 49 व अनिकेत शिरोडकरने 19 धावा केल्या. एमआरएफ स्पोर्ट्स क्लबसाठी चेतन म्हार्दोळकरने 39 धावात 4, चंदन बोरकरने 23 धावात 2 तर सर्वेश गावडे, के. आर. अक्षय व सर्वेश प्रभुगावकरने प्रत्येकी एक गडी बाद केला.
एमआरएफ स्पोर्ट्स क्लबने 24.1 षटकात 5 बाद 138 धावा करून सहज विजय नोंदविला. त्यांच्या जग्गू पाटीलने 43 चेंडूत 8 चौकारांनी 50, हरी म्हामलने 19, सर्वेश प्रभुगावकरने 15 तर चेतन म्हार्दोळकरने नाबाद 21 धावा केल्या. सिको क्लबसाठी निसर्ग नागवेकरने 29 धावात 2 तर गुरुदीप चोडणकर व नरेश मडगावकरने प्रत्येकी एक गडी बाद केला.