वृत्तसंस्था/ दुबई
आयपीएल क्रिकेट स्पर्धेत रविवारी येथे होणाऱया क्रिकेट सामन्यात धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जसमोर कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर संघाचे मोठे आव्हान राहील. पण आव्हान संपुष्टात आले असल्याने चेन्नईवर कोणतेच दडपण असणार नाही. त्यामुळे जाता जाता आरसीबीला ते धक्का देण्याचीही शक्यता वाटते. हा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 3.30 वाजता सुरू होईल.
आतापर्यंत तीनवेळा आयपीएल स्पर्धा जिंकणाऱया चेन्नई सुपर किंग्ज संघाला यावेळी मात्र आपली मक्तेदारी राखता आली नाही. सर्वच विभागात चेन्नई संघाची कामगिरी अत्यंत निकृष्ट झाल्याने या संघाचे प्लेऑफ गटात स्थान मिळविण्याचे स्वप्न संपुष्टात आले आहे. चेन्नई संघाने आतापर्यंत या स्पर्धेत 11 सामन्यांतून केवळ 6 गुण मिळविले असून त्यांनी 8 सामने गमविले आहेत. आता उर्वरित शेवटच्या तीन सामन्यात औपचारिकता बाकी राहील. या शेवटच्या तीन सामन्यात धाव सरासरीमध्ये मोठी सुधारणा होणे जरूरीचे असून त्यांना हे सर्व सामने जिंकावेच लागतील तरच प्लेऑफसाठी त्यांना आशा बाळगता येईल. त्याचप्रमाणे इतर संघांच्या सामन्यातील निकालावरही चेन्नईचे भवितव्य अवलंबून राहील. कर्णधार धोनीवर अलिकडे मोठय़ा प्रमाणात टीका होत आहे. तसेच संघातील नवोदित खेळाडूवर त्याचा पूर्ण विश्वास नसल्याचे दिसून येते. यापूर्वी झालेल्या मुंबई इंडियन्स विरूद्धच्या सामन्यात ऋतुराज गायकवाड आणि नारायण जगदीशन या नवोदितांना चेन्नई संघाने संधी दिली होती पण बोल्ट आणि बुमराह यांच्या भेदक माऱयासमोर चेन्नईची फलंदाजी पूर्णपणे कोलमडली. त्यांची एकवेळ स्थिती 5 बाद 21 अशी केविलवाणी झाली होती. गेल्या शुक्रवारच्या सामन्यात चेन्नई संघाला मुंबई संघाकडून पहिल्यांदाच 10 गडय़ांनी दणदणीत पराभव पत्करावा लागला होता.
कोहलीच्या नेतृत्वाखाली बेंगळूर संघाची या स्पर्धेतील वाटचाल समाधानकारक असून ते स्पर्धेच्या गुणतक्त्यात 14 गुणांसह तिसऱया स्थानावर आहेत. मुंबई इंडियन्स पहिल्या, दिल्ली कॅपिटल्स दुसऱया स्थानावर असून या तिन्ही संघांनी समान 14 गुण नोंदविले असले तरी सरस धावसरासरीच्या जोरावर मुंबई इंडियन्स पहिल्या स्थानावर आहे. रविवारच्या सामन्यात बेंगळूरचा संघ महत्त्वाचे दोन गुण मिळविण्यासाठी प्रयत्नशील राहील. राजस्थान आणि कोलकाता या संघांवर मिळविलेल्या शानदार विजयामुळे बेंगळूर संघाचा आत्मविश्वास निश्चित वाढला आहे.