प्रतिनिधी /पर्वरी
येथील चोगम रस्त्यावरील वाढत्या रहदारीमुळे आणि बेशिस्त पार्किंगमुळे येथे अनेक अपघात होत असून काहींचे हकनाक बळी जात आहेत. या वाढत्या अपघाताना आळा घालणे आणि वाहतुकीला शिस्त लावण्याच्या हेतूने आज पर्यटनमंत्री रोहन खंवटे आणि साळगाव आमदार केदार नाईक यांनी पिळर्ण आणि सुकुर पंचयात तसेच वाहतूक खाते, सार्वजनिक बांधकाम खाते तसेच पर्यटन खात्यातील अधिकाऱयांना घेऊन आज पाहणी केली आहे.
येत्या आठ दिवसात संबंधित लोकांशी विचारविनिमय करून ठोस उपयोजन करण्यात येणार असल्याची माहिती पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांनी दिली. यावेळी साळगाव आमदार केदार नाईक, पिळर्ण सरपंच संदीप बांदोडकर, पंच अजय गोवेकर,करण गोवेकर, संतोष बांदोडकर, सुकूर सरपंच संदीप मांजरेकर तसेच सर्व खात्याचे अधिकारी उपस्थित होते.
गोवा हे पर्यटकांचे आवडते स्थळ असल्याने अनेक पर्यटक दर वषी येत असतात.तसेच जागतिक किर्तीचा कळंगूट समुद्र किनाऱयावर जाण्यासाठी चोगम रास्ता हा जवळचा असल्याने पर्यटन मौसमच्या दिवसात या रस्त्यावर प्रचंड रहदारी असते. त्यामुळे अपघातही होत असतात.या प्रश्नावर कायम स्वरूपी तोडगा काढण्यासाठी आज ही पाहणी करण्यात आली आहे. तसेच कोकेरो सर्कल ते आमरेकर देवस्थान पर्यन्त रास्ता दुभाजक घालण्याचंही विचार असल्याचे पर्यटन मंत्री खंवटे यांनी सांगितले.
पर्यटन मंत्री खंवटे यांनी आपल्या पदाचा ताबा घेतल्यानंतर गेली अनेक दिवस प्रलंबित असलेला हा विषय प्राधान्यक्रमाने घेतल्याबद्दल आमदार केदार नाईक यांनी त्यांचे आभार मानले. तसेच हा प्रश्न सोडविण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.