वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
टोकियो ऑलिंपिक स्पर्धेत भारताला सुवर्णपदक मिळवून देणारा भालाफेक ऍथलीट नीरज चोप्रा याला जर्मनीचे प्रशिक्षक क्लॉस बार्टोनीझ यांचे मार्गदर्शन लाभले होते. आता बार्टोनीझ आणि नीरज चोप्रा यांच्यातील करारामध्ये वाढ करण्यात आली असून आता 2024 च्या पॅरीस ऑलिंपिक स्पर्धेपर्यंत बार्टोनीझ नीरज चोप्राचे प्रमुख प्रशिक्षक राहतील. सदर माहिती अखिल भारतीय ऍथलेटिक्स फेडरेशनच्या प्रवक्त्याने दिली.
टोकियो ऑलिंपिक स्पर्धेत नीरज चोप्राने पुरूषांच्या भालाफेकीत ऐतिहासिक कामगिरी करताना भारताला सुवर्णपदक मिळवून दिले. ऑलिंपिकच्या इतिहासामध्ये चोप्राने ऍथलेटिक्स या क्रीडाप्रकारात भारताला हे पहिले सुवर्णपदक मिळवून दिले आहे. त्याचप्रमाणे पुरूषांच्या 400 मी. रिले संघासाठी प्रशिक्षक गॅलिना बुखारीना यांच्या प्रशिक्षक कालावधीमध्येही वाढ करण्यात आली असून या वर्षांअखेरीस चीनमध्ये होणाऱया आशियाई क्रीडास्पर्धेपर्यंत त्यांना मुदतवाढ देण्यात आली आहे. अखिल भारतीय ऍथलेटिक्स फेडरेशनने 2022 च्या कालावधीतील वार्षिक स्पर्धा वेळापत्रक तसेच प्रशिक्षण कार्यक्रमांची रूपरेषा क्रीडामंत्रालयाकडे सादर केली आहे.