गांधीनगर येथील जैन मंदिरात झाली होती चोरी
बेळगाव : बेळगाव शहर व उपनगरांमध्ये चोऱया, घरफोडय़ा वाढल्या आहेत. चोरटय़ांनी खास करुन मंदिरांना लक्ष्य बनविले आहे. रविवारी गांधीनगर येथील जैन मंदिरातून चोरण्यात आलेल्या मूर्ती गुरुवारी सकाळी सापडल्या आहेत. चोरटय़ांनी पोत्यात बांधून त्या टाकून दिल्याचे आढळून आले आहे.
सोमवार दि. 6 डिसेंबर रोजी सकाळी चोरीचा प्रकार उघडकीस आला होता. मारुती रोड, गांधीनगर येथील शांतीनाथ दिगंबर जैन मंदिराचा कडीकोयंडा तोडून तीर्थंकरांची मूर्ती, दानपेटी, स्पीकर सेट आदी ऐवज चोरटय़ांनी पळविला होता.या प्रकरणी माळमारुती पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी चोरटय़ांचा शोध घेण्याआधीच चोरीच्या मूर्ती सापडल्या आहेत. जैन मंदिरापासून अर्धा कि. मी. अंतरावरील एका गोदामाजवळ सिमेंटच्या पोत्यात बांधून मूर्ती टाकून देण्यात आल्या होत्या. हा प्रकार उघडकीस येताच स्थानिक नागरिकांनी माळमारुती पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी मूर्ती असलेले पोते ताब्यात घेतले आहे. चोरटय़ांनी दानपेटी, स्पीकर सेट व देवीच्या गळय़ातील मंगळसूत्र पळविले आहे. उर्वरित तीर्थंकरांच्या मूर्ती, अष्टमंगल, ज्वालामालीनी देवीची मूर्ती पोत्यात बांधून टाकून देण्यात आल्या आहेत. पोलिसांनी त्या मूर्ती ताब्यात घेतल्या असून आता न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करुन संबंधितांना त्या मूर्ती परत मिळवाव्या लागणार आहेत.