अनधिकृत-विनापरवाना जाहिरात फलक लावलेल्यांना भरावा लागणार दंड : महसूल वाढीसाठी प्रयत्न
प्रतिनिधी / बेळगाव
महापालिका व्याप्तीमध्ये होर्डिंग लावण्यास बंदी घालण्यात आली आहे. कॅन्टोन्मेंटने महसूल वसुलीसाठी होर्डिंग लावण्याचे कंत्राट दिले आहे. मात्र काही ठिकाणी अनधिकृतरित्या विनापरवाना होर्डिंग लावण्यात येत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे अनधिकृत बॅनर आणि कटआऊट हटविण्याची कारवाई कॅन्टोन्मेंटकडून करण्यात आली.
कॅन्टोन्मेंट हद्दीतील प्रमुख रस्ते, विविध चौक अशा ठिकाणी जाहिरात फलक लावण्यात आले आहेत. याकरिता कॅन्टोन्मेंटने निविदा काढली आहे. कॅन्टोन्मेंटला केंद्रशासन आणि राज्यशासनाकडून निधी मंजूर करण्यात येत होता. मात्र गेल्या काही वर्षांपासून शासनाकडून कोणतेच अनुदान देण्यात आले नाही. त्यामुळे कारभार चालविणे कठीण बनले आहे. अशातच होर्डिंग लावण्यावर राज्य शासनाने बंदी घातली आहे. पण कॅन्टोन्मेंटकडे निधी नसल्याने होर्डिंग बंदीची कारवाई केली नाही. कॅन्टोन्मेंट हद्दीतील मुख्य रस्त्यांवर तसेच विविध चौकात मोठमोठे जाहिरात फलक उभारण्यात आले आहेत. सदर जाहिरात फलकांच्या माध्यमातून कॅन्टोन्मेंटला निधी उपलब्ध होतो. त्यामुळे दरवषी जाहिरात फलक लावण्यासाठी निविदा काढण्यात येतात. पण काही ठिकाणी विनापरवाना जाहिरात फलक, बॅनर आणि कटआऊट लावण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. सदर जाहिरातदारांनी कॅन्टोन्मेंटकडून कोणतीच परवानगी घेतली नाही. जाहिरात फलक लावण्यासाठी परवानगी घ्या, अशी सूचना करूनही जाहिरातदारांनी दुर्लक्ष केले होते. त्यामुळे कॅन्टोन्मेंटच्यावतीने सदर अनधिकृत फलक हटविण्याची कारवाई करण्यात आली आहे. विविध ठिकाणी लावण्यात आलेले अनधिकृत शेकडो जाहिरात फलक काढण्यात आले.
जाहिरातदारांना नोटीस बजावण्यात येणार
सदर जाहिरातदारावर दंडात्मक कारवाईसह जाहिरात शुल्क वसूल करण्याचा निर्णय कॅन्टोन्मेंट बोर्डने घेतला आहे. जाहिरात फलकाची विचारणा करणाऱयांकडून दंड वसूल करण्यात येत आहे. तसेच जाहिरातदारांना नोटीस बजावण्यात येणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. अनधिकृत आणि विनापरवाना जाहिरात फलक लावलेल्यांना दंड भरावा लागणार आहे.