मान्सूनच्या पहिल्याच पावसाची दमदार हजेरी : आठ दिवसांपासून घाटमाथ्यावरील धबधबे झालेत प्रवाहित
पिराजी कुऱहाडे /खानापूर
खानापूर तालुका म्हणजे निसर्ग संपत्तीने समृद्ध असलेला तालुका. या तालुक्याला निसर्गाची फार मोठी साथ असून ती जादा तर पश्चिम व दक्षिण भागात मोठय़ा प्रमाणात आहे. पश्चिम घाटात पणजी-चोर्ला रस्त्यावर तसेच खानापूर तालुक्याच्या सरहद्दीत येणाऱया पारवाड-चिखले मार्गावर अनेक धबधबे पावसाळय़ात पर्यटकांना साद देतात. यावर्षीही गेल्या आठ दिवसात झालेल्या धुवाधार पावसाने घाटमाथ्यावरील सर्व धबधबे प्रवाहीत झाले असून पर्यटकाना साद घालत आहेत.
यावर्षी मान्सूनच्या पहिल्या पहिल्या पावसाने पाणीच पाणी केले. सध्या तालुक्यात पावसाने विसावा घेतला असला तरी डोंगरमाथ्यावरील मोठय़ा पावसाने धबधबे प्रवाहीत झाले आहेत. गेल्या आठ दिवसात तालुक्याच्या निसर्गसंपन्न घाटमाथ्यावरील अनेक धबधबे पर्यटकांना साद घालत आहेत. पण गेल्या काही दिवसापासून सर्वत्र लॉकडाऊन असल्याने पर्यटकांनीही निसर्गाचा आनंद लुटण्याकडे पाठ फिरवली आहे. गेल्या शनिवार, रविवारी विकेंड लॉकडाऊन असल्याने पर्यटकांची तुरळक गर्दी झाली होती. आता सरकारने अनलॉक केल्याने पर्यटकांना आता फिरण्यास अडचण नाही. पण कोरोनाची धास्ती कायम असल्याने नियमांचे पालन अत्यावश्यक आहे.
तालुक्याच्या पश्चिम भागात उगम पावलेली म्हादई नदी पुढे गोव्यात जाऊन मांडवी या नावाने ओळखली जाते. खानापूर तालुक्यात पवित्र अशा मलप्रभा, मार्कंडेय व म्हादई नद्यांचा उगम झाला आहे. या सर्वच नद्यांचे वरदान खानापूर तालुक्याला लाभलेले असून म्हादई नदीवर या भागात अनेक धबधबे आपणास पाहावयास मिळतात. अनलॉक केल्यामुळे आता या निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांची गर्दी वाढणार यात शंकाच नाही.
लाडकीचा धबधबा
घाटमाथ्यावरील सुरलच्या पहाडावरून दिसणारा लाडकीचा धबधबा पर्यटकांना साद घालतो. मात्र, या ठिकाणी पोहचण्यास पर्यटकांना संधी मिळत नाही. अशीच स्थिती पारवाड, चिखले मार्गावरील सवतुरा धबधब्याची आहे. या ठिकाणी म्हादई नदीत झोकावणारे अनेक धबधबे पर्यटकांना आकर्षित करतात. सुरल येथील लाडकीचा धबधबा पाहण्यासाठी दरवर्षी सुरलच्या पहाडावर पर्यटकांची एकच गर्दी झालेली असते. पण वाढत्या गैरप्रकारामुळे सुरलची दारू व बार बंद केल्याने आता पर्यटकांची गोची झाली आहे.
कणकुंबी ते चोर्ला दरम्यान पणजी राज्यमार्गाच्या दुतर्फा दऱयाखोऱयांच्या निसर्गसंपन्न वातावरणात अनेक धबधबेही पर्यटकांना साद घालतात. या रस्त्यावर असलेला इरडीचा धबधबा चोर्लापासून चार कि. मी. वर गोव्याला जाताना लागतो. हा धबधबा पावसाळय़ात दुरूनच पाहावा लागतो.
गोव्याचा हद्दीत झेपावणारा सवतरा धबधबा
कणकुंबीच्या दक्षिण भागातील चिखले-पारवाड रस्त्यावरील सवतुरा धबधबा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे. त्याच्याच जवळील भागात ‘देहूची न्हाय’ हाही धबधबा पर्यटकांना आकर्षित करतो. बेळगावपासून 40 किलोमीटर अंतरावर असलेल्या या भागात अनेक धबधबे आहेत.
वज्रपोहा फॉल्सपर्यंतची खडतर वाट
जांबोटी जवळचच्या वज्रपोहा या धबधब्यापर्यंतचा मार्ग खडतर आहे. या धबधब्यापर्यंत पोहचण्यास जांबोटी ते चापोली 8 कि. मी. चा वाहनाने प्रवास करावा लागतो. म्हादई नदीच्या काठाने खाली काही अंतर उतरल्यास हा रम्य व डोळय़ाचे पारणे फेडणारा 160 फूट उंचीवरून झेपावणारा पांढरा शुभ्र दुधाचा आभास निर्माण करणारा वज्रपोहा धबधबा पहावयास मिळतो. हा धबधबा बारमाही प्रवाहीत असतो.