वार्ताहर /काकती
होनगा परिसरात खरीप पिकांची उगवण चांगली झाली असून्। माळरानावरील पिके तरारली आहेत. गेले दोन दिवस पावसाने उघडीप दिल्याने कोळपणीच्या कामाला सुरुवात होणार आहे. भातरोप लागवडीसाठी गादी वाफ्यावर रोपाची वाढ उत्तम झाली असून जुलै महिन्याच्या दुसऱया आठवडय़ात भातरोप लागवड होणार आहे.
होनगा शिवारात केवळ 3 टक्के क्षेत्रात भाताची पेरणी झाली असून, 97 टक्के क्षेत्रात रोप लागवड होणार आहे. गादी वाफ्यावर भाताची रोपे तीन पानावर आली आहेत. होनग्यात भात पिकाचे उद्दिष्ट 850 एकरात आहे. तर बेन्नाळीत 100 एकरात 100 टक्के इंद्रायणी वाणाची भातरोप लागवड होणार आहे.
उघडीप मिळाल्याने कोळपणीला होणार प्रारंभ
होनगा माळरानातील 60 एकरात मका पीक आहे. गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत 20 टक्के क्षेत्रात घट झाली आहे. भुईमूग पीक 30 एकरात तर रताळी 5 एकरात आहेत. या पिकांची स्थिती उत्तम असून उघडीप मिळाली असल्याने कोळपणीच्या कामांना सुरुवात होणार आहे.
होनगा परिसरातील भुतरामट्टी, जुमनाळ, ईरणभावी, केंचनट्टी, हळ्ळेहोसूर, बबनट्टी आदी भागात कापसाचे पीक मोठय़ा प्रमाणात असून यंदा बटाटा पीक लागवड क्षेत्रात 95 टक्के घट झाली आहे. बटाटा पिकाला कोंब आले आहेत. सुरुवातीपासूनच कीड व रोगराईचा परिणाम होत असल्याने या भागातील मका पीक क्षेत्रात घट झाली आहे. त्यामुळे सोयाबीन पिकाचे क्षेत्र वाढले आहे. बाजारपेठेत सोयाबीनचे भाव दुपटीने वाढले आहेत. परिणामी सोयाबीन हे एकमेव फायद्याचे ठरले आहे. भुईमूगाचे पीकही जोमदार असून कोळपणीला आले आहे. तर रताळी वेलीला कोंब आले आहेत. सध्या खरीप पिकांना पोषक वातावरण मिळाले असल्याने शेतकरी वर्ग सुखावला आहे.