प्रतिनिधी/ रत्नागिरी
जिल्हा कोव्हीड रूग्णालयात उपचार घेणाऱया दापोली येथील रूग्णाचा शनिवारी मृत्यू झाला. त्यामुळे जिल्हय़ातील कोरोना बळींची संख्या 41 झाली आहे. दरम्यान 24 तासांत जिल्हय़ात 34 नवे रूग्ण सापडल्याने बाधीतांची संख्या 1164 झाली आहे. रत्नागिरी शहरातील एका खासगी हॉस्पीटलमध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्याने डॉक्टरांसह कर्मचारी व रूग्णांनाही क्वारंटाईन करण्यात आले आहे.
जिल्हयात कोरोनाचा फैलाव प्रचंड वेगाने होत आहे. गेल्या चार दिवसात 200 हून अधिक रूग्ण सापडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. यामध्ये कोरोनायोद्धेही मोठय़ा प्रमाणावर बाधीत होत असल्याने चिंता वाढली आहे. जिल्हा कोव्हीड रुग्णालय, रत्नागिरी येथे 14, घरडा, खेड 16 तर ऍन्टीजेन टेस्टमध्ये आढळलेल्या 4 जणांचा समावेश आहे.
रत्नागिरीतील हॉस्पिटल सील
शुक्रवारी रात्रीपासून पॉझीटीव्ह अहवाल आलेल्यांमध्ये रत्नागिरीती मोठय़ा खासगी हॉस्पीटलमध्ये कोरोनाचा मोठा शिरकाव झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या रूग्णालयातील दोन पेशंट व 2 नर्सना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे हॉस्पीटल सील करण्यात आले असून डॉक्टरांसह सर्व कर्मचारी व काही रूग्णांनाही क्वारंटाईन करण्यात आले आहे.
26 जण कोरोनामुक्त
जिल्हय़ात आणखी 26 रुग्ण बरे झाले असून त्यांना शनिवारी घरी सोडण्यात आले. यामुळे कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या 708 झाली आहे. आज बरे झालेल्यांमध्ये जिल्हा कोव्हीड रुग्णालय येथून 13, कोव्हिड केअर सेंटर घरडा, लवेल येथून 5, उपजिल्हा रुग्णालय कामथे 3, कोव्हीड केअर सेंटर केकेव्ही, दापोली 1 आणि समाजकल्याण रत्नागिरी मधील चौघांजा समावेश आहे.
540 अहवाल प्रलंबीत
जिल्हा रुग्णालयामार्फत एकूण 13 हजार 559 नमुने तपासण्यात आले आहेत. त्यातील 1164 अहवाल पॉजिटीव्ह तर 11 हजार 847 अहवाल निगेटीव्ह आले आहेत. अजून 540 नमुन्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहेत. प्रलंबीत अहवालांमध्यें घरडा केमिकल्सच्या खाजगी लॅबचे आकडे समाविष्ठ नसल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.