ऑनलाईन टीम / छत्तीसगड :
छत्तीसगडमधील सुकमा आणि विजापूर या नक्षलग्रस्त भागात शनिवारी सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत 22 जवान शहीद झाले आहेत. त्यामधील 17 जवानांचे पार्थिव हाती आले आहेत. दरम्यान, या चकमकीत जखमी झालेल्या 23 जवानांना विजापूरच्या तर 7 जवानांना रायपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर बेपत्ता जवानांचा शोध घेण्यासाठी सर्च ऑपरेशन सुरू आहे.
शनिवारी दुपारच्या सुमारास सुकमा आणि विजापूर जिल्ह्यातील तारेम येथे नक्षली आणि सीआरपीएफ जवानांमध्ये चकमक झाली. या चकमकीत 22 जवानांना वीरमरण आले असून, 10 नक्षली ठार झाले. चकमकीनंतर जंगल भागातून मोठा शस्त्रसाठा सुरक्षा दलाच्या जवानांनी जप्त केला. त्यानंतर एटीएफ, डीआरजी, सीआरपीएफ आणि कोब्रा पथकाच्या 400 जवानांनी या परिसरात शोधमोहीम सुरू केली.