युवराज संभाजीराजे छत्रपती यांचे प्रतिपादन : होनगा येथील अश्वारुढ शिवपुतळ्याचे थाटात लोकार्पण : मान्यवरांची उपस्थिती
वार्ताहर /काकती
अलोट जनसागराच्या साक्षीने, चैतन्याने भारावलेल्या शिवमय वातावरणात, अंगावर रोमांच उभा करणाऱ्या युवा-युवतींची सळसळती शिवभक्ती, शिव छत्रपतींच्या जयघोषात डोळ्याचे पारणे फेडणारा छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याचा लोकार्पण सोहळा होनगा येथील श्री काळभैरवनाथ देवस्थान परिसरात पारंपरिक हलगी वादनाच्या गजरात व शोभायात्रेच्या अमाप उत्साहात माजी खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते झालरची रिबीन सरकवून करण्यात आला.
युवराज संभाजीराजेनी शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन केले. आमदार सतीश जारकीहोळी, आमदार अंजलीताई निंबाळकर यांनीही अभिवादन केले. या सोहळ्यावेळी रंगीबेरंगी आतषबाजी व फुलांची उधळण करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार सतीश जारकीहोळी होते. कार्यक्रमाची सुरुवात मराठा मंडळ हायस्कूलच्या विद्यार्थिनींच्या स्वागतगीताने झाली. तर प्रास्ताविक शिव छत्रपती प्रतिष्ठान सेवा संघाचे महेश रामभाऊ आनंदाचे यांनी केले. व्यासपीठावर सद्गुरु विठ्ठल (दादा) वासकर महाराज, आमदार चन्नराज हट्टीहोळी, आमदार अनिल बेनके, आमदार लखन जारकीहोळी, विनायक केसरकर, पंडित नागेशशास्त्री हेर्लेकर, अभियंता एम. एम. मुतगेकर, मूर्तीकार जे. जे. पाटील, अरुण कटांबळे, अॅड. भैरू टक्केकर, पाटील, विनायक केसरकर, अनिल आनंदाचे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी युवराज संभाजीराजे छत्रपती म्हणाले, छ. शिवाजी महाराजांचा संघर्ष हा कुठली जात, धर्म, भाषा असा नव्हता. तर संघर्ष रयतेच्या राज्यासाठी होता. छत्रपती सर्व जाती धर्माचे पुरस्कर्ते होते. त्यांनी मावळ्यांच्या साथीने आपल्या समोरील बलाढ्या शत्रूंना धूळ चारली. राजमाता जिजाऊंनी पाहिलेले स्वराज्याचे स्वप्न साकारले.
होनगा गावाबद्दल बोलताना ते म्हणाले, आजच्या सोहळ्याची उपस्थिती ही खूप काही सांगून जाते. भर उन्हात आया-बहिणी माझे विचार ऐकण्यात दंग आहेत. हा माझा मोठेपणा नसून छ. शिवाजी महाराजांचा पुतळा लोकार्पण सोहळा आहे. त्यांचे वंशज म्हणून माझेही भाग्य समजतो, असे भावनाविवश उद्गार त्यांनी काढले.
आमदार अंजलीताई निंबाळकर म्हणाल्या, जातीभेदावरून राजकारण करू नये. विकासासाठी एकत्रित काम करा, महापुरुष हे सगळ्यांचे आहेत. छ. शिवाजी महाराजांचे आचार-विचार प्रेरणादायी असून सर्वांनी अंगीकारावे, असे सांगून शुभेच्छा दिल्या. आमदार चन्नराज हट्टीहोळी यांनी मनोगत व्यक्त करून शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते प्रा. मधुकर मुकुंद पाटील यांनी छ. शिवाजी महाराजांच्या गुणांचा उलगडा केला. अध्यक्षपदावरून बोलताना आमदार सतीश जारकीहोळी म्हणाले, शिवाजी महाराज हे सर्वांचे होते. इतिहास हा कोणाला बदलता येणार नाही तो सदैव राहणार आहे. छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला 10 लाखाचा निधी दिला असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमात राजमुद्राचे उद्घाटन कॉन्ट्रॅक्टर एन. एस. चौगुले व एस. जे. इंडस्ट्रीजचे जेठाभाई पटेल, चौथरा उद्घाटन संयोजक मंडळ ग्रामस्थ, गंगापूजन सर्व धर्मीय सुवासिनी महिला, दीपप्रज्वलन आमदार जारकीहोळींच्या हस्ते करण्यात आले. संयोजक मंडळाचे अध्यक्ष शिवाजी आनंदाचे, विनायक केसरकर, व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचा सत्कार शाल, श्रीफळ, पुष्पहार छत्रपतींची प्रतिमा भेट देऊन करण्यात आला. होनगा, बेन्नाळी, देवगिरी, कडोली, काकती, दुर्गम भागातील वीस हजारहून अधिक शिवप्रेमींची उपस्थिती होती. महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली.