वृत्तसंस्था/टोकियो
जपानमध्ये कोव्हिड 19 रुग्णांच्या संख्येत मोठय़ा प्रमाणात वाढ होत असल्याचे पाहून जगातील सर्वात वयस्कर व्यक्तीने ऑलिम्पिक टॉर्च रिलेमधून माघार घेतली आहे. सदर महिला 118 वर्षांची आहे. दक्षिण जपानमधील फुकुओकाच्या रहिवाशी असलेल्या केन तनाका यांनी ऑलिम्पिक टॉर्च व्हीलचेअरवरून नेण्याची योजना आखली होती. येत्या मंगळवारी ही टॉर्च शहरात येणार आहे. कोरोनाच्या प्रसारावर रोखण्यात यंत्रणेला पुरेसे यश आले नसल्याने या रिलेमध्ये भाग घेणार नसल्याचे तनाका यांनी म्हटल्याचे त्यांच्या कुटुंबियांनी सांगितले. शुक्रवारी टोकियो व अन्य राज्यांत जपान सरकारने कोरोना इमर्जन्सी जाहीर केली असून फुकुओका व आणखी एका भागात कडक निर्बंध घातले आहेत. ‘केन तनाका ज्या केअर होममध्ये राहतात तेथे विषाणूंचा संसर्ग रोखण्यासाठी बाहेरच्यांना प्रवेशबंदी करण्यात आली असून तेथे राहणारे सर्व जण सुरक्षित आहेत,’ असेही कुटुंबियांनी सांगितले.