प्रा. सुभाष वेलिंगकर यांचा सांगे धरण्यावेळी इशारा
प्रतिनिधी / सांगे
मातृभाषांचा नाश म्हणजे संस्कृतीचा नाश करू पाहणार्या या सरकारने, प्राथमिक स्तरावर इंग्रजीला चालू केलेले सरकारी अनुदान बंद न केल्यास गोमंतकीय मातृभाषाप्रेमी जनता येत्या निवडणुकीत भाजपाला 2017 तील 13 आमदारांवरून शून्यावर आणल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा सांगे बसस्टँडवर झालेल्या सांगे प्रभाग थरणाच्या वेळी बोलताना राज्य निमंत्रक प्राचार्य सुभाष वेलिंगकर यानी सरकारला दिला.
यावेळी भारतमाता की जय संघाचे राज्य कार्यवाह प्रा. प्रविण नेसवणकर ,सहकार्यवाह प्रा. दत्ता पु. नाईक(शिरोडा) दक्षिण गोवा कार्यवाह, श्रीराम पालकर, गोवा सुरक्षा मंचचे राज्य उपाध्यक्ष विनय नाईक, सागे तालुका संघचालक मा. रामकृष्ण वेर्लेकर आदि उपस्थित होते.
प्रारंभी प्रास्ताविक सांगे प्रभाग भाभासुमं प्रमुख गजानन हरमलकर यानी केले. 450 वर्षांच्या पोर्तुगीज दास्यत्व व दडपशाहीमुळे क्षीण होऊ घातलेली गोव्याची भारतीय संस्कृतीला पुष्टी देण्याच्या कार्याला सर्वप्रथम प्राधान्य देऊन हजारभर मराठी मातृभाषेच्या प्राथमिक शाळा सुरु करण्याचा राष्ट्रीय द्रष्टेपणा दाखवणारे मुक्त गोव्याचे पहिले मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर कुठे, आणि संस्कृती व मातृभाषाप्रेमाची केवळ सोंगे आणि ढोंगे आणून, त्याच मूलभूत प्राथमिक स्तरावर इंग्रजीला प्रोत्साहन देऊन चर्चच्या इंग्रजी शाळांना, मराठी-कोकणीचा गळा घोटून, कोटय़ावधी रुपयांचे अनुदान सरकारी तिजोरीतून प्रदान करणारी 2012 पासूनची भाजपाची आजतागायतची सरकारे कुठे, असा प्रश्न सुभाष वेलिंगकर यानी उपस्थित केला . यांना मातृभाषेचे भक्षकच म्हटले पाहिजे असे ते म्हणाले.
यावेळी विनय नाईक, सुहासिनी खांडोळकर, एकनाथ यमकर यांचीही भाषणे झाली. आभार प्रदर्शन रामकृष्ण वेर्लेकर यानी केले.कार्यक्रमास महिला, युवा व भाषाप्रेमी नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.